Mamata Banerjee Slams BJP: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी  (Mamata Banerjee)  यांनी तृणमूल काँग्रेस (TMC) वरील भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. ममता बॅनर्जी सोमवारी एका रॅलीत म्हणाल्या की, "निर्वाचित सरकार पाडण्यासाठी भारतीय जनता पक्षाला (BJP) पैसे कोठून मिळतात याचे उत्तर द्यावे. निवडून आलेल्या राज्य सरकारांना पाडण्यासाठी काळा पैसा  (Black Money) वापरला जात आहे आणि केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे.''


ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या की, "भाजपचे नेते बेटी बचाओच्या गप्पा मारतात, पण त्यांच्या सरकारने बिल्कीस बानो प्रकरणातील दोषींना सोडले आहे. ते तृणमूल आणि आम्हाला चोर म्हणत आहेत. होय घोटाळा झाला आहे आणि तो डाव्या पक्षांनी केला आहे. नोकरी देण्यासाठी पैसे घेण्याच्या त्यांची संस्कृती आहे."


'मला अटक करा' 


भ्रष्टाचाराच्या वेगवेगळ्या आरोपात टीएमसीच्या काही नेत्यांना अटक करण्यात आली आहे. यावर बोलताना त्या म्हणाल्या आहेत की,"हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. आम्ही भ्रष्ट असल्याचे सिद्ध करणारा कोणताही पुरावा न्यायालयात मांडण्यात आला नाही. तरीही मीडिया ट्रायल सुरू असून ते आम्हाला चोर म्हणत आहेत. हे सर्व षडयंत्र आहे. मीडियावर विश्वास ठेवू नका. ते आमच्या नेत्यांच्या मागे लागले आहेत. मी त्यांना (भाजपला) आव्हान देते की मला अटक करा. मी तुरुंगातून लढेन आणि जिंकेन. तुम्ही माझ्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही.'' 


ममता बॅनर्जी म्हणाल्या की, "त्यांनी आमचे पैसे रोखले आहेत. त्यांनी लोकांचे पैसे रोखले आहेत. त्यांनी केंद्रीय तपास यंत्रणा आमच्या मागे लावल्या आहेत. उद्योगपतींच्या घरांवर तपास यंत्रांनी छापे टाकले आहेत. पैसे उकळून ते देशाबाहेर जमा केले जात आहेत. ते म्हणत आहेत की ममता बॅनर्जी कुटुंबाने पैसा आणि संपत्ती निर्माण केली आहे. मी त्यांना हे प्रकरण भारताबाहेरील आंतरराष्ट्रीय न्यायालयात चालवण्यास सांगते.''


"महाराष्ट्र सरकार पाडण्यासाठी पैसा कुठून आला?"


ममता बॅनर्जी म्हणाल्या, "महाराष्ट्र सरकार पाडण्यासाठी तुम्ही किती पैसे खर्च केलेत. हा पैसा कुठून आला? तुम्ही झारखंडच्या आमदारांना पैसे देऊ केलेत. तुम्हाला झारखंड सरकार पडायची आहे. मी हे थांबवले आहे. अरविंद केजरीवाल म्हणतात, त्यांच्या आमदारांना पैसे देऊ केले आहेत. बंगालमध्ये त्यांनी तपास यंत्रणा आमच्या मागे लावल्या आहेत.


दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी बिल्कीस बानो यांच्या समर्थनार्थ कोलकाता येथे दोन दिवसीय धरणे आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. या धरणे आंदोलनाचे नेतृत्व टीएमसीच्या दोन महिला मंत्री करणार आहेत. त्यांनी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्याची मागणी करत दोषींना पुन्हा तुरुंगात पाठवावे, अशी मागणी केली आहे.