Loksabha Election, Mumbai : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात आज मुंबईतील लोकसभेच्या 6 जागांसह राज्यातील 13 मतदारसंघांत मतदान पार पडले. दरम्यान, मतदान प्रक्रिया पार पडत असताना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून बोगस मतदानाचे आरोप करण्यात आले. दुसरीकडे काही ठिकाणी राडे झाले. तर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये संथ मतदानावरुन चांगलीच जुंपलेली पाहायला मिळाली. आज दिवसभरात मुंबईत काय काय घडलं? जाणून घेऊयात...
राजन विचारे आणि कपिल पाटलांकडून बोगस मतदानाचे आरोप
सकाळपासून शांततेत मतदान होत असताना सायंकाळी चारनंतर केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्याकडे बोगस मतदान होत असल्याची तक्रार आली. त्यानंतर कपिल पाटील हे थेट मतदान केंद्रावर धडकले व त्या ठिकाणी त्यांनी जोरदार राडा केला. एवढेच नव्हे तर मतदान केंद्रावर मतदातांना तसेच अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांना दमदाटी व शिवीगाळ देखील केली. हा प्रकार शहरातील मिलत नगर, खंडू पाडा, बाला कंपाउंड परिसरात असलेल्या मतदान केंद्रावर भेट दिली होती. याशिवाय ठाकरेंचे ठाण्याचे उमेदवार राजन विचारे यांच्याकडूनही सकाळपासून बोगस मतदानाचे आरोप करण्यात येत होते.
रवींद्र वायकर आणि निवडणूक अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची
मुंबईच्या गोरेगाव पूर्वेत आरे कॉलनी परिसरात मतदार केंद्रात निवडणूक अधिकारी आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याची पाहायला मिळाली. ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांचे कार्यकर्ते डमी ईव्हीएम मशीन घेऊन बसले आहेत, या संदर्भात माहिती घेण्यासाठी उमेदवार रवींद्र वायकर मतदार केंद्रित आले असता अधिकारी आणि रवींद्र वायकर यांच्यामध्ये बाचाबाची झाली.
भिवंडीत कपिल पाटील आणि सुरेश म्हात्रेंमध्ये आरोप-प्रत्यारोप
भिवंडी शहरामध्ये सकाळपासून शांततेत सुरू असलेल्या मतदानात सायंकाळी काही ठिकाणी वादंग होत गालबोट लागलं. भाजपा उमेदवार कपिल पाटील बोगस मतदानाची तक्रार करत स्वतः या मतदान केंद्रांवरती धावून आले. त्या ठिकाणी त्यांनी निवडणूक अधिकारी तसेच पोलीस यंत्रणा यांना धारेवर धरत मतदान केंद्र परिसरात उभे असलेल्या नागरिकांच्या घोळक्याला बाहेर हाकलून लावण्यासाठी मागणी करीत या भागातील मतदान केंद्रावरील गर्दी बाजूला केली. या वेळी अनेक मतदान केंद्रावर बोगस मतदान होत असल्याच्या तक्रारी कपिल पाटील यांनी केल्या.
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये जुंपली
ठाकरे गटाला ज्या ठिकाणी मतदान जास्त पडतंय त्या ठिकाणी केंद्रावर जाणूनबूजून विलंब केला जातोय, मतदारांना मुद्दामून ताटकळत ठेवले जात आहे, असे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. त्यानंतर कितीही वेळ लागला तरी मतदारांनी मतदान करावं असं आवाहनही ठाकरेंनी केलं. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं. मुंबईत संथ गतीने मतदान होत असल्याची तक्रार सर्वप्रथम आम्हीच आयोगाकडे केली. आता मात्र, नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी त्यांचे रडगाणे सुरु केले आहे. पराभव समोर स्पष्ट दिसत असताना त्यांनी सवयीप्रमाणे मोदीजींवर आरोप करणे प्रारंभ केले आहे. 4 जूननंतरच्या स्थितीला सामोरे जाण्याची पार्श्वभूमी ते आताच तयार करीत आहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
वरळी विधानसभेतील ठाकरे गटाच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू
वरळी विधानसभेतील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याचा आज मृत्यू झाला. मनोहर नलगे या कार्यकर्त्याचा वयाच्या 62 व्या वर्षी मृत्यू झाल्याची माहिती आहे. डिलाय रोड येथील बीडीडी चाळ क्रमांक 20 च्या इथं म्हस्कर उद्यानात ठाकरे गटाचा पुलिंग बूथ होता. उन्हामुळे आज आणि प्रचंड उकाड्यामुळे या कार्यकर्त्याला त्रास होत ,असल्याचे त्या ठिकाणी उपस्थित आणि सांगितलं. अचानक चक्कर येऊन कोसळल्यानंतर त्यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. शिवसैनिकाला केईएम रुग्णालयात दाखल केलं असताना डॉक्टरांनी मृत्यू घोषित केला.
इतर महत्वाच्या बातम्या