West Bengal Minister Sadhan Pande Passed Away : पश्चिम बंगाल सरकारमधील मंत्री साधन पांडे यांचे आज सकाळी मुंबईत निधन झाले. वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. पांडे हे बंगाल सरकारमध्ये ग्राहक व्यवहार, बचत गट आणि स्वयंरोजगार विभागाचे मंत्री होते.


साधन पांडे यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना ममता यांनी ट्विट करत लिहिले की, ''पक्षाचे नेते आणि कॅबिनेट मंत्री साधन पांडे यांचे आज सकाळी मुंबईत निधन झाले. त्यांच्याशी माझे चांगले संबंध होते. या नुकसानीचे मला मनस्वी दु:ख झाले आहे. त्यांचे कुटुंबीय, मित्र, अनुयायी यांच्याबद्दल माझ्या मनःपूर्वक संवेदना.''


 






दीर्घ काळापासून होते आजारी 


साधन पांडे हे मागील एक वर्षापासून आजारी होते. गेल्या वर्षी जुलैमध्ये त्यांना फुफ्फुसात गंभीर संसर्ग झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोलकाता येथील एका खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (ICU) त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. छातीत दुखू लागल्याने आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याने पांडे यांना शनिवारी रात्री उशिरा अर्धबेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले, जिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, पांडे यांच्या पश्चात त्यांची मुलगी श्रेया असा परिवार आहे. पांडे 2011 पर्यंत उत्तर कोलकाता येथील बर्टोला मतदारसंघातून पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. पश्चिम बंगालमध्ये 2021 मध्ये झालेल्या निवडणुकीतही याच मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला होता. त्यानंतर राज्यात तृणमूल पक्षाची सरकार स्थापन झाल्यानंतर त्याची कॅबिनेट मंत्रीपदी नेमणूक करण्यात आली होती.      







LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha