Amol Kolhe: आज औरंगाबाद दौऱ्यावर असलेले एमआयएम नेते अकबरुद्दीन ओवेसी हे औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन नतमस्तक झाले आहेत. यावरूनच आता राज्याचे राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. औरंगजेबाच्या कबरीवर नतमस्तक झाल्याने राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी ओवेसी यांना लक्ष्य केलं आहे. ते म्हणाले आहेत की, ''ज्या औरंगजेबाने स्वतःच्या वडिलांचे हाल केले. ज्याने सख्ख्या भावंडांची कत्तल केली. त्या माणसाचं उदात्तीकरण करून तुम्ही नेमकं कोणतं उदाहरण समाजासमोर ठेऊ पाहताय.'' पुण्यात जश्न-ए ईद ए मिलन या राष्ट्रीय एकात्मता स्नेह मेळावा पार पडला. या कार्यक्रमात बोलताना ते असे म्हणाले आहेत. 


अमोल कोल्हे म्हणाले की, ''आज एक हैदराबादचे महाशय औरंगाबादमध्ये आले आहेत. औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन नतमस्तक झाले. ज्या औरंगजेबाने स्वतःच्या वडिलांचे हाल केले. ज्याने सख्ख्या भावंडांची कत्तल केली. त्या माणसाचं उदात्तीकरण करून तुम्ही नेमकं कोणतं उदाहरण समाजासमोर ठेऊ पाहताय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात त्यांचे अंगरक्षक हे मुस्लिम होते. तेंव्हा अठरा पगड जातीचे सगळे एकत्र आले, ते स्वाभीमानासाठी. रयतेचे राज्य निर्माण करण्यासाठी. तेंव्हा असं वागा की, माझा माझ्या राष्ट्राला अभिमान वाटेल. जेंव्हा अशी भावना बळावते तेंव्हा कोणत्याही अतिरेकी वंश वादावर जातो, तेंव्हा तो राष्ट्र कधी टिकत नाही. जर्मनी, अफगाणिस्तान याची जिवंत उदाहरणे आपल्या समोर आहेत. तेंव्हा हातात येणारा दगड कोणत्या कामासाठी वापरतो, हे महत्त्वाचं. एक दगड समाज जोडू शकतो, अन् तो विकास कामासाठी वापरला तर तो दगड समाजाच्या वापरासाठी येतो.''


भोंग्यावरून सुरू असलेल्या राजकारणावरून ते म्हणाले, ''देशात ज्या पद्धतीचे वातावरण आहे. त्यावरून एक प्रसंग सांगू इच्छितो. एक भोंग्याचं दुकान दिसलं. त्या दुकानात एक हिरवा आणि एक भगवा भोंगा दिसला. तिसरा होता विना रंगाचा भोंगा. हिरवा आणि भगवा भोंगा तावतावात भांडत होते. तेंव्हा विना रंगाचा भोंगा म्हणाला, आज तुमचे दिवस आहेत, दोन वर्षापूर्वी माझे दिवस होते. कोरोनाच्या काळात माझाच वापर केला गेला. तितक्यात एक मुलगा येतो, अन् तो दुकानदाराला म्हणतो, मला विना रंगाचा भोंगा द्या. तो म्हणतो हाच भोंगा का हवा? तेंव्हा विद्यार्थी म्हणतो की, या रंगाच्या भोंग्यातून वेगळं काही ऐकायला येईल, पण या विना रंगाच्या भोंग्यातून जन गण मन ऐकू येईल.''