नांदेड : लोकसभा निवडणुकांमध्ये यंदा महायुती म्हणून भाजप-शिवसेना आणि अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणे लढली. यावेळी, शिवसेना पक्षातही उमेदवारी देताना काही निर्णय अचानक घेण्यात आले. तर, विद्यमान खासदार असलेल्या भावना गवळी यांची उमेदवारी कापण्यात आली होती. अखेर, आपली उमेदवारी कापल्याची सल आजही भावना गवळी यांच्या मनात असल्याचे दिसून आले. कारण, एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी थेट हेमंत पाटील यांच्यावरच निशाणा साधला. विदर्भातील मुली निश्चितच चांगल्या आहेत, पण मराठवाड्यातील जावई मात्र तिकडे येऊन कब्जा करत आहेत. काही हरकत नाही, पण आमचं मन मोठं आहे, आम्ही त्यांची सरबई करायला तयार आहोत, असे म्हणत शिवसेना शिंदे गटाच्या आमदार भावना गवळी यांनी माजी खासदार हेमंत पाटील यांना टोला लगावला. नांदेड येथे रविवारी कुणबी मराठा महासंघाचा मेळावा संपन्न झाला. या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. लोकसभा निवडणुकांमध्ये मी पाच वेळा निवडून आले आहे. कदाचित यावेळी मी निवडून आली असती तर केंद्रात मंत्री राहिली असते, अशी खदखद देखील गवळी यांनी व्यक्त केली. त्यामुळे, मराठा महासंघाच्या मेळाव्यातील त्यांच्या भाषणाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. 


नांदेडमध्ये (nanded) मराठा महासंघाच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, मेळाव्यात मराठा आरक्षण व सगेसोयरेच्या अनुषंगाने झालेल्या चर्चेपेक्षा आमदार भावना गवळी यांचं भाषण जास्त चर्चेचं ठरलं. कारण, या भाषणातून त्यांनी आपली मंत्रीपदाची संधी कशी हुकली, हेच सांगितलं. विदर्भातील मुली निश्चितच चांगल्या आहेत, पण मराठवाड्यातील जावई मात्र तिकडे येऊन कब्जा करत आहेत, असे म्हणत हेमंत पाटील यांच्या पत्नीला देण्यात आलेल्या उमेवारीवरुन टोला लगावला. आमदार भावना गवळी (Bhavana gawali) पुढे म्हणाल्या की, विदर्भातील माणसे प्रेमळ असतात. म्हणूनच तर विदर्भातील मुली मराठवाड्यात जास्तीत जास्त आहेत. आपण सर्व सगे-सोयरे आहोत. त्यामुळे कुणबी सग्यासोयऱ्याचा विषयही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हाताळतील, असा विश्वास गवळी यांनी यावेळी व्यक्त केला. कुणबी मराठा समाजाच्या जितक्या काही मागण्या आहेत. त्या सर्व पूर्ण करण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेईन अस देखील त्यांनी म्हटलं. यावेळी मराठा-कुणबी समाजातील उद्योग क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. 


तर मी केंद्रात मंत्री राहिले असते


यवतमाळ-वाशीम मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीमध्ये ऐनवेळी विद्यमान खासदार भावना गवळी यांची उमेदवारी कट करुन हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. तेंव्हापासून भावना गवळी नाराज होत्या. मात्र, शिवसेनेकडून त्यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली. नांदेड येथील कार्यक्रमात त्यांनी खदखद व्यक्त करत यावेळी मला उमेदवारी मिळून मी निवडून आले असते तर केंद्रात मंत्री झाले असते, असे म्हटले. तसेच केंद्रात नाही मिळाले तरी राज्यात मंत्री पद मिळेल, अशी आशाही गवळी यांनी व्यक्त केली. मला कुणीही कितीही टार्गेट केले तरी मी थांबणार नाही, मी खंबीरपणे उभी राहणार आहे, असे देखील भावना गवळी यांनी म्हटले. 


हेही वाचा


सुप्रिया सुळे म्हणाल्या, कॉन्ट्रॅक्टर ठाण्याचा, मुख्यमंत्र्यांनी सांगितला वाऱ्याचा वेग; शिवरायांच्या पुतळ्यावरुन जुंपली