सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील मालवणमध्ये नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) शौर्याला सलाम म्हणून पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. राजकोट किल्ल्यावर या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडलं होतं. मात्र हा पुतळा दुर्दैवानं कोसळला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी दोषींवर गुन्हे झाले पाहिजे अन्यथा आम्ही जिल्ह्यात नाही तर राज्यभर आंदोलन करू, असा इशारा दिला होता. यानंतर आता वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी हातात रॉड घेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ऑफिसची सिनेस्टाईल तोडफोड केली आहे.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना देशातील पहिल्या आरमाराचे जनक म्हणून ओळखले जातात. भारतीय नौदलाने देखील आपल्या ध्वजावर शिवरायांची राजमुद्रा छापली आहे. या पार्श्वभूमीवर नौदलाच्या वतीने 4 डिसेंबर 2023 चा नौदल दिन छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ले सिंधुदुर्गच्या साक्षीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निमित्ताने राजकोट किल्ल्यावर नौदल आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाला होता. मात्र दुर्दैवाने हा पुतळा कोसळला आहे. हा पुतळा नेमका कसा कोसळला? याबाबत अजून स्पष्टता झालेली नाही.
वैभव नाईकांचा संताप
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर आमदार वैभव नाईक चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले. त्यांनी याप्रकरणी दोषींवर गुन्हे करण्याची मागणी केली आहे. गुन्हे दाखल झाले नाहीत तर जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. या नंतर वैभव नाईक थेट सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ऑफिसमध्ये दाखल झाले. हातात रॉड घेऊन त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ऑफिसमध्ये सिनेस्टाईल तोडतोड केली.
शिवप्रेमी म्हणून घटनेचा निषेध : वैभव नाईक
दरम्यान, पुतळा कोसळल्यानंतर आमदार वैभव नाईक यांनी प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले की, शिवाजी महाराजांचा पुतळा हा निकृष्ट कामामुळे कोसळला आहे. याबद्दल आम्हाला दु:ख होत असून एक शिवप्रेमी म्हणून आम्ही याचा निषेध करतो. सहा महिन्यांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून हा पुतळा उभरण्यात आला होता . ज्यावेळी काम सुरू होते त्यावेळी स्थानिक लोकांनी सुद्धा कामासंदर्भात तक्रारी केल्या होत्या. पण त्यावेळी दुर्लक्ष करण्यात आले. जे विरोध करत आहेत ते आपल्या विरोधात आहे, असा समज करुन घेण्यात आला. 400 वर्षापूर्वी उभारण्यात आलेल्या किल्ल्याचा एकही भाग ढासळला नाही, पण सहा महिन्यांपूर्वी केलेले येथील काम ढासळले, असे त्यांनी म्हटले होते.
रवींद्र चव्हाणांवर फौजदारी कारवाई करावी
दरम्यान, आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची विटंबना ही शासन निर्मितीतच आहे. या दुर्घटनेत शिवरायांच्या अवमानास जबाबदार असणाऱ्या महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण व इतर अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी केली आहे.
आणखी वाचा