नाशिक : युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आज छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्याला भाजपकडून (BJP) कडाडून विरोध करण्यात आला.  रामा हॉटेलबाहेर भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्ते आमनेसामने आले होते. यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसंच दिशा सालीयनचे फोटो असणारे पोस्टर घेऊन यावेळी आदित्य ठाकरेंचा निषेध करण्यात आला. यावेळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला.यावरून आदित्य ठाकरे यांनी आज आमच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज झाला आहे. त्यासाठी मी पोलिसांना दोष देत नाही. त्यांना वरून कुणीतरी आदेश दिला असेल, असे वक्तव्य केले. आता यावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. 


प्रकाश आंबेडकरांची उद्धव ठाकरेंवर टीका 


प्रकाश आंबेडकर यांनी नाशिक येथे पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात पण लाठीचार्ज झाला होता. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सरकारच्या काळात पण लाठीचार्ज होत आहे. ठाकरे यांनी कोणाकडे बोटं करू नये. इतरांवर एक बोट करत असताना आपल्याकडे चार बोटं असतात, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. 


हे सरकार भ्रष्टाचाराचे माहेर घर


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) शौर्याला सलाम म्हणून पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. मात्र हा पुतळा दुर्दैवानं कोसळला आहे. याबाबत विचारले असता प्रकाश आंबेडकर म्हणाले की, हे सरकार भ्रष्टाचाराचे माहेर घर आहे. रस्ते, उड्डाण पूल यात मोठे भ्रष्टाचार झाले असल्याचा आरोप त्यांनी यावेळी सरकारवर केला आहे. 


प्रकाश आंबेडकरांची छगन भुजबळांना मोठी ऑफर 


तर प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांना मोठी ऑफर दिली आहे. छगन भुजबळ हेच १०० टक्के ओबीसी नेते आहेत. त्यांच्या पक्षात ओबीसींवर बोलले जाते का? याबाबत त्यांनी सांगावं, असे म्हणत छगन भुजबळ यांनी आमच्या सोबत यावं, त्यांना मी खुली ऑफर देत आहे, असे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. आता प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यावर छगन भुजबळ काय प्रतिक्रिया देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 


आणखी वाचा


Prakash Ambedkar : लाडकी बहीण योजनेला पैसा कुठून आला? आदिवासींचे बजेट वर्ग केले का? प्रकाश आंबेडकरांचा आरोप