Bacchu Kadu Meets CM Eknath Shinde : "थोडी नाराजी आहे, पण एवढी जास्त नाराजी नाही की गट सोडून दुसऱ्या पक्षात जाऊ," अशी प्रतिक्रिया अपक्ष आमदार आणि प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी दिली. बच्चू कडू यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांच्यात 'नंदनवन' या शासकीय निवासस्थानी चर्चा झाली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना बच्चू कडू यांनी मंत्रिपद न मिळाल्याने थोडी नाराजी असल्याचं म्हटलं.


शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर पार पडला. राजभवनातील दरबार हॉलमध्ये काल (9 ऑगस्ट) 18 आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. परंतु मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू नाराज झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रीपद देतो म्हणून मला शब्द दिला होता, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली. त्यानंतर आज बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.


बच्चू कडू म्हणाले की, "थोडी नाराजी आहे, पण एवढी जास्त नाराजी नाही की गट सोडून दुसऱ्या पक्षात जाऊ. ही क्षणिक नाराजी आहे. पुढे विस्तार व्हायचा आहे. मी मंत्रिपदासाठी त्यांना पाठिंबा दिलेला नाही. काही मु्द्द्यांवरुन पाठिंबा दिली. जर ते होत नसेल म्हणून तर आम्ही विचार करु. मंत्रिपद देण्याचं आश्वासन दिलं म्हणून आम्ही मागितलं. जर आश्वासन दिलं नसतं तर आम्ही मागितलंच नसतं. हे राजकारण आहे. इथे दोन आणि दोन चार नाही तर शून्यही असू शकतो."


मंत्रीमंडळ विस्तारानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, 'नाराज आहे असा विषय नाही, प्रत्येकाला वाटतं मी मंत्री बनले पाहिजे. मला मंत्रिपदासाठी थांबवले म्हणजे कायमचं थांबवलं नाही, काही दिवसासाठी थांबवलं आहे... एकत्र राहायचं म्हणजे समजून घ्यावे लागणार.'


Maharashtra Cabinet Expansion : तर अकेला बच्चू कडू काफी है, मंत्रिमंडळ विस्तारानंतर बच्चू कडूंची प्रतिक्रिया


20 जणांचे हे मंत्रिमंडळ -
सरकार स्थापन झाल्यानंतर तब्बल 40 दिवसांनी राज्याला कारभारी मिळाले. 40 दिवसांपासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार  काल (9 ऑगस्ट) पार पडला. राजभवनातील दरबार हॉलमध्ये एकूण 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये शिंदे गटाचे नऊ तर भाजपकडून नऊ जणांचा शपथविधी पार पडला. या सर्व आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकूण 20 जणांचे हे मंत्रिमंडळ असणार आहे. 


महाराष्ट्राचे नवे मंत्री 


शिंदे गटातील मंत्री 


गुलाबराव पाटील 
दादा भुसे
संजय राठोड 
संदीपान भुमरे
उदय सामंत 
तानाजी सावंत
अब्दुल सत्तार
दीपक केसरकर
शंभूराज देसाई


भाजपतील मंत्री


राधाकृष्ण विखे पाटील
सुधीर मुनगंटीवार
चंद्रकांत पाटील
विजयकुमार गावित
गिरीश महाजन
सुरेश खाडे
रवींद्र चव्हाण
अतुल सावे
मंगलप्रभात लोढा