BJP Reaction On Shiv Sena Symbol News: निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेत  शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं आहे. यासोबतच शिवसेना हे नाव देखील आता ठाकरे आणि शिंदे गटाला वापरता येणार नाही, असं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. यामुळे या दोन्ही गटाला मोठा धक्का बसला आहे. यावरच आता भाजप नेत्यांनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावरच बोलताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत की, ''आम्हाला आनंद ही नाही, खंत ही नाही आणि दुःख ही नाही.''

  


सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत की, ''आम्हाला आनंद ही नाही, खंत ही नाही आणि दुःख ही नाही. कारण हा निर्णय भारतीय जनता पक्षाशी संबंधित नाही. भारतीय जनता पक्षाचे काम हे जनतेत जात जनतेचा विश्वास संपादित करत भविष्यामधील भारत घडवण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता अग्रेसर राहणं, हे आमचं काम आहे. वैचारिक व्यासपीठ हे मजबूत असावं. वैचारिक बैठकीवर काम करावं, या अपेक्षाने आम्ही सर्वजण काम करतो. शिवसेनेच्या संदर्भात बघायचं असेल तर, त्यांनी जनादेशाचा अवमान केला होता. 24 ऑक्टोबर 2019 चार वाजताची ती पत्रकार परिषद निवडणुकीचे निकाल लागत होते. त्यावेळी त्यांच्या मनामध्ये सत्तेचा मोह निर्माण झाला. यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत त्यांनी 28 नोव्हेंबर 2019 मध्ये सत्ता स्थापन केली. जेव्हा अशा पद्धतीने जनतेचा अवमान करून सत्ता स्थापन होते, तेव्हा पक्षात बंड होतो आणि ते झालं.''      


मुनगंटीवार पुढे म्हणाले की, ''निवडणूक आयोगाचे काम आहे की सर्व कागदपत्र पाहायची, तर्क पाहायची आणि तर्कसंगत निर्णय द्यायचा. हा प्रकार पहिल्यांदा घडला नाही. याआधी बैल जोडी, गाय-वासरू असे निर्णय घेण्यात आले होते. त्यावरच आधारित हा निर्णय होता.'' भाजपने पडद्यामागून केलेली ही खेळी आहे, असा आरोप भाजपवर ठाकरे गटाकडून होत आहे. याबाबत त्यांना प्रश्न केला असता ते म्हणाले की, शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची परवानगी मिळाली, तेव्हा मग भाजपच्या कार्यकर्त्यांना धन्यवाद का नाही दिले, असं ठाकरे गटाला लक्ष करत ते म्हणाले आहेत. ते म्हणाले की, तेव्हा तुम्ही म्हणाला की, न्यायव्यस्थेच्या माध्यमातून आमचा विजय झाला. आज तुमच्या विरोधात (ठाकरे गटाविरोधात) निर्णय लागला, तर भाजपवर आरोप करून सहानभूती मिळवण्याचा प्रयत्न सुरु आहे.  


ये तो होना ही था : सोमय्या 


भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ट्वीट करत ते म्हणाले आहेत की, ये तो होना ही था. उद्धव ठाकरे गटाचा पराभव.