ABP News Survey On Mallikarjun Kharge: देशात आगामी लोकसभा 2024 ची निवडणूक रंगतदार ठरणार आहे. याच कारण म्हणजे सर्वच पक्ष हे आतापासूनच या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. याशिवाय याच आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे गेल्या दोन दशकानंतर काँग्रेसला पहिल्यांदा गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष मिळणार आहे. ज्यांच्या नेतृत्वात काँग्रेस आगामी 12 राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि लोकसभा निवडणूक लढवणार आहे. याच दरम्यान  काँग्रेसमध्ये अध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) आणि शशी थरूर (Shashi Tharoor) सध्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. यातच  एबीपी न्यूज दर आठवड्याला देशाचा मूड जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. 


एबीपी न्यूजसाठी सी व्होटरने काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडीसंदर्भात एक सर्वेक्षण केले आहे. बुधवार ते शुक्रवार या कालावधीत हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. सी व्होटरच्या या सर्वेक्षणात 5 हजार 291 लोकांशी संवाद साधला आहे. सर्वेक्षणाचे निकाल पूर्णपणे लोकांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहेत. सर्वेक्षणातील एररचे मार्जिन प्लस मायन्स 3 ते प्लस मायन्स 5 टक्क्यांपर्यंत आहे. 


मल्लिकार्जुन खरगे यांच्याबद्दल लोकांचे मत काय?


सी व्होटरच्या या सर्वेक्षणात प्रश्न विचारण्यात आला होता की, मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे अध्यक्ष झाले तर ते गांधी कुटुंबियांचे रबर स्टॅम्प म्हणून काम करतील का? या प्रश्नावर सर्वेक्षणात सहभागी झालेल्या लोकांनी आपलं मत मांडलं आहे. सर्वेक्षणात 60 टक्के लोकांनी होय, मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे अध्यक्ष झाले तर ते गांधी कुटुंबियांचे रबर स्टॅम्प ठरतील, असे म्हटले आहे. त्याचबरोबर मल्लिकार्जुन खरगे हे यापुढे गांधी कुटुंबियांचे रबर स्टॅम्प म्हणून काम करणार नाही, असे 40 टक्के लोकांचे मत आहे.


मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे अध्यक्ष झाले तर ते गांधी कुटुंबियांचे रबर स्टॅम्प म्हणून काम करतील का?


होय : 60
नाही : 40


दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची निवडणूक जाहीर झाल्यापासून पक्षात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. गांधी घराण्यातील कोणत्याही सदस्याने निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केल्यानंतर काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी सर्वात आधी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. यानंतर आणखी नेते या शर्यतीत सामील झाले. पक्षाध्यक्षपदाच्या या स्पर्धेत अखेर मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर राहिले. या निवडणुकीसाठी 17 ऑक्टोबरला मतदान होणार असून 19 ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे.