Wardha News वर्धा : वर्ध्याच्या नगर परिषदेमध्ये बांधकाम कंत्राटदाराने वर्धा नगर परिषदेच्या उपमुख्य अधिकाऱ्याला फोनवर अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे नगर परिषद कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त करत काम बंद आंदोलन पुकारले आहे. यात उपमुख्य अधिकारी अभिजित मोटघरे यांना ही शिवीगाळ करण्यात आलीय. नगर परिषदेत कुठलेच काम न करता काळ्या फिती लावून कर्मचाऱ्यांनी या घटनेचा निषेध केला आहे. परिणामी संतप्त शेकडो कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केल्याने परिषदेचे कामे खोळंबली असून या कंत्राटदारावर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नगर परिषदेच्या कर्मचार्‍यांकडून करण्यात आली आहे.


संतप्त शेकडो कर्मचाऱ्यांनी केले काम बंद आंदोलन


वर्ध्याच्या नगर परिषदेमध्ये काम करणाऱ्या एका बांधकाम कंत्राटदाराने वर्ध्यात दहा कोटीच्या बांधकामाची कामे केले. मात्र काम पूर्ण झाल्यानंतरही बिले लवकर मिळाली नसल्याने नगर परिषदेच्या अधिकाऱ्याला फोनवरून त्याने दमदाटी केली. यावेळी उपमुख्य अधिकारी अभिजित मोटघरे यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून अधिकाऱ्यावर दडपशाही करण्याचाही प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे नगर परिषदेमधील तब्बल दोनशे कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. यावेळी घोषणाबाजी करीत आंदोलन करण्यात आले आहे. नगर परिषदेत पोहचलेल्या सर्वसामान्य माणसांची कामे मात्र या घटनेमुळे प्रभावित झाले आहे. त्यामुळे आता या प्रकरणी नेमकी काय कारवाई केली जाते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 


वन विभागाच्या पथकावर जीवघेणा हल्ला


अमरावतीच्या वडाळी परिसरात घोरपडींची (Bengal Monitor) राजरोस विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान, वडाळी येथील पारधी बेड्यावर विक्रीसाठी काही घोरपडी आणल्या गेल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. ही माहिती मिळातच ही विक्री रोखण्यासाठी गेलेल्या वनविभाग आणि पोलिसांच्या पथकावर येथील समूहाकडून प्राणघातक हल्ल्या (Crime News) करण्यात आलाय. यात वन विभागाचे दोन वनमजूर जखमी झाले असून पोलीस पथकाने हल्ला परतवून लावत चार घोरपडी जप्त केल्या आहेत. तसेच यातील एका संशयित आरोपीलाही ताब्यात घेण्यात आले आहे. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास ही थरारक घटना घडली असून या प्रकारामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.


चार घोरपडींसह मारेकरी तब्यात


राज्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान अनेक भागात पावसाळ्याच्या प्रारंभी घोरपडींची छुप्प्या पद्धतीने विक्री काही समूहाकडून केली जाते. अमरावतीच्या वडाळी येथील पारधी बेड्यावरही  विक्रीसाठी घोरपडी आणल्या गेल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. दरम्यान, वन विभागाने तात्काळ पोलिसांच्या मदतीने पारधी बेडयावर धाड टाकली. त्यामुळे बिथरलेल्या पारधी समूहाने वन विभाग आणि पोलीस विभागाच्या पथकावर हल्ला चढवला. या घटनेत एक वनमजूर जखमी झालाय. तर या घटनेतील एका संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. तर  इतर काही लोक पळुन गेल्याची माहिती आहे. वनविभागाच्या सहायक वनसंरक्षक ज्योती पवार यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आलीय. तर या घटनेचा पुढील तपास सध्या वन विभाग आणि पोलीस करत आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या