Wardha Lok Sabha Election Constituency : नागपूर : वर्धा मतदारसंघात (Wardha Lok Sabha Constituency) लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) सासरे विरुद्ध सुनबाईंची लढत रंगणार आहे. या लढतीची संपूर्ण राज्यात चर्चा आहे. भाजपकडून (BJP) आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रामदास तडस (Ramdas Tadas) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर, त्यांच्या विरोधात त्यांच्या स्नुषा पूजा तडस (Pooja Tadas) या अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत. अशातच आज पूजा तडस यांनी रामदास तडस यांच्यावर आणि संपूर्ण तडस कुटुंबियांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.


महत्त्वाची बाब म्हणजे, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आज नागपुरातील प्रेस क्लबमध्ये एक पत्रकार परिषद घेतली आणि याच पत्रकाप परिषदेत पूजा तडसंही उपस्थित होत्या. याच पत्रकार परिषदेत बोलताना पूजा तडस यांनी संपूर्ण तडस कुटुंबियांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. 


रामदास तडस यांच्या सुश्ना पूजा तडस म्हणाल्या की, "मला मुल झालं त्यावेळी तडस परिवाराकडून बोलण्यात आलं की, हे बाळ कोणाचं? या बाळाची डीएनए टेस्क करा, असं बोलण्यात आलं. मला रॉडनंही मारण्यात आलं, मोदीजी 20 तारखेला वर्ध्यात सभेसाठी येणार आहे. मी पंतप्रधान मोदींना एक विनंत करते की, माझ्या मुलाला न्याय द्या. मोदींनी सभेसाठी आल्यानंतर मला थोडा वेळ द्या आणि त्यांना मला न्याय द्यावा."


मला एका फ्लॅटवर ठेवलं, उपभोगाची वस्तू म्हणून वापरलं : पूजा तडस


"लग्नानंतर मला एका फ्लॅटवर ठेवलं, मला उपभोगाची वस्तू म्हणून वापरण्यात आलं. त्याच्यातून बाळाचा जन्म झाला. खासदार आणि कुटुंबीय म्हणतात बाळाची डीएनए चाचणी करण्यास सांगितलं जातं. खासदार म्हणतात, मी मुलाला बेदखल केलं, मुलाला घरातून काढलं नाही, मग मला एकटीलाच का काढलं घराबाहेर? माझ्याशी राजकारण करता.", असं पूजा तडस म्हणाल्या. 


पूजा तडस बोलताना म्हणाल्या की, "मी डीएनए चाचणीसाठी तयार आहे. मात्र, माझी विनंती आहे ती कोर्टाच्या माध्यमातून करा. मला दोन वेळचं अन्नही दिलं जात नाही. मोदीजी तुम्ही रामदास तडस यांची 20 तारखेला सभा घेण्यासाठी वर्ध्यात येणार आहात. तेव्हा मला दोन मिनिटांचा वेळ द्या. तडस कुटुंबीयांनी मला न्याय दिला नाही. म्हणून मी लोकांच्या न्यायालयात न्याय मागण्यासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे."


हे राजकीय षडयंत्र : पंकज तडस 


पूजा तडस यांच्या आरोपांनंतर पंकज तडस यांनी एबीपी माझाला आपली प्रतिक्रिया दिली. पंकज तडस म्हणाले की, "2020 मधील घटना आहे. यामध्ये 10 लोकांनी मला हनी ट्रॅप करुन फसवल्याचे सर्व पुरावे मी न्यायालयासमोर सादर केले आहेत. त्यांच्यावर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी काहीजण आज जामिनावर बाहेर आहेत. या पूजा तडस आहेत, या जाणूनबुजून कोर्टात हजर राहत नाही. आम्ही यांच्याविरोधात खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हाही दाखल केला आहे. तसेच, मी माझा विवाह रद्द करण्यासाठी न्यायालयात दादही मागितली आहे."


"हे सर्व प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यानं मी याबाबत जास्त बोलू शकत नाही. पण विरोधी पक्षाच्या नेत्यांना हाताशी धरुन यांना केवळ माध्यमांमध्ये प्रसिद्धी हवी आहे. तसेच, तडस कुटुंबियांना बदनाम करण्याचं षडयंत्र आहे. माझ्यावर केलेला आरोप आहे, तो केवळ लोकसभेच्या प्रचारासाठी आहे. संविधानानं निवडणूक लढवण्याचा सर्वांना हक्क दिला आहे. पण लोकसभेचा फॉर्म भरण्यासाठी यांच्याकडे कुठून पैसा येतो, यांच्याकडे माध्यमांमध्ये प्रसिद्धीसाठी पैसा कुठून येतो.", असे प्रश्नही पंकज तडस यांनी उपस्थित केले आहेत. 


माझी काय चूक? मी काय गुन्हा केला : रामदास तडस 


सुनेनं मुलावर केलेल्या गंभीर आरोपांनंतर रामदास तडस यांनीही एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, "पूजा तडस आणि पंकज तडस यांचं तीन वर्षांपूर्वी लग्न झालं. काही दिवस दोघांचा सुखी संसार सुरू होता. पण काही समाजकंटकांनी पुजा तडस यांना हाताशी धरुन काही कट रचले. यासंदर्भातील संपूर्ण कॅसेट पंकज तडस यांनी कोर्टात सादर केली आहे. तसेच, हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यामुळे मला जास्त काही बोलता येणार नाही. पण हे प्रकरण विरोधकांचा डाव आहे. विरोधी पक्षाला हाताशी धरुन लोकसभेची उमेदवारी दाखल करायची, पत्रकार परिषद घ्यायची, हा कट आहे. त्यांनी वाट्टेल ते आरोप माझ्यावर केले आहेत."


"दोघांनी ज्यावेळी मला सांगितलं त्यावेळी मला काहीच माहिती नव्हतं. दोघेही वेगळे राहत होते. मी माझ्या मुलाला बेदखल करुन टाकलं होतं. पण यासर्व प्रकरणात माझी काय चूक? मी काय केलंय? मला राजकारणात 40 वर्ष झाली आहेत. मी आतापर्यंत कोणाचंही मन दुखावलं नाही. उलट त्या दोघांचं मध्यंतरीच्या काळात जमत नव्हतं त्यावेळी महिनाभर आमच्या घरी राहू दिलं. त्यानंतर तिची समजूत काढून तिला पुन्हा नवऱ्याकडे पाठवलं.", असं रामदास तडस म्हणाले आहेत. 


पाहा व्हिडीओ : Ramdas Tadas On Pooja Tadas : पंकजन परस्पर लग्न केलं, परस्पर वेगळे झाले याच्याशी माझा काय संबध