मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा राजकीय सामना रंगणार आहे. महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांनी यापूर्वीच पत्रकार परिषद घेऊन एकत्र लढणार असल्याची घोषणाही केली. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीतील यशानंतर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी जागावाटपावरही चर्चा सुरू केली आहे. मात्र, दुसरीकडे काँग्रेसने राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवले आहेत. महाराष्ट्र काँग्रेस (Congress) कमिटीच्या उपाध्यक्ष नाना गावंडे यांच्या सहीने यासंदर्भात परिपत्रक जारी करण्यात आलं असून शहर व तालुक्यातील सर्वच जिल्हाध्यक्षांना हे पत्र पाठवण्यात आलं आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या सूचनेनुसार हे पत्र पाठवण्यात येत असल्याचेही पत्रात नमूद केलं आहे. विशेष म्हणजे आमदार पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 20 हजार रुपये पक्षनिधी द्यावा लागणार आहे. 


काँग्रेसकडून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी स्वबळाची चाचपणी करण्यात येत असून राज्यातील 288 मतदारसंघातून काँग्रेसने इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. 10 जुलैपर्यंत प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयात इच्छुकांना आपले अर्ज जमा करण्याचे आवाहनही महाराष्ट्र राज्य प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे. अर्जासोबत सर्वसाधारण उमेदवारांना पक्षनिधी म्हणून 20 हजार रुपये जमा करावे लागणार आहेत. तर, अनुसुचित जाती, जमाती आणि महिला उमेदवारांना 10 हजार रूपये भरावे लागतील. महाविकास आघाडीत लढायचं ठरलेलं असतांनाही काँग्रेसचं 'प्लॅन बी'वर काम सुरू असल्याचं या परिपत्रकातून दिसून येत आहे. त्यातच, इच्छुक उमेदवारांकडून घेण्यात येणारा पक्षनिधी चर्चेचा विषय बनला आहे. 


राज्यातील विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबर 2024 मध्ये होत आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशावरुन या निवडणुकीसाठी पक्षाच्या इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. 


अर्जासाठी नियमावली


इच्छुक उमेदवारांनी अर्ज प्रदेश काँग्रेस कमिटी कार्यालयात दि. 10 ऑगस्ट 2024 पर्यंत जमा करावेत.


विधानसभा मतदारसंघांसाठी उमेदवारी अर्जासोबत सर्वसाधारण वर्गासाठी रुपये 20,000/- (अक्षरी रुपये वीस हजार मात्र) आणि अनु. जाती, अनु. जमाती, व महिला उमेदवारांसाठी रुपये 10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार मात्र) याप्रमाणे रक्कम पक्षनिधी म्हणून रोख अथवा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी च्या नांवे डी. डी. द्वारे प्रदेश कार्यालयाकडे किंवा जिल्हा काँग्रेस कमिटीकडे जमा करावेत.


जे उमेदवारी अर्ज जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये जमा होतील ते उमेदवारी अर्ज पक्षनिधीसह प्रदेश कार्यालयाकडे उपरोक्त दिनांकापूर्वी सादर करावेत.


प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सुचनेनुसार आपणांस कळविण्यात येते की, आपण वरील माहिती वृत्तपत्र तसेच इतर प्रसार माध्यमांद्वारे आपल्या जिल्हयातील सर्व विधानसभा मतदारसंघांमधील इच्छुक उमेदवारांपर्यंत पोहचवावी.


असे परिपत्रकात म्हटले आहे. 


हेही वाचा


विधानसभेसाठी रणनीती आणि विधान परिषदेसाठी मतांची जुळवा जुळव,'मविआ'च्या बैठकीत काय काय ठरलं?