Walmik Karad Surrender : बीड येथील मस्साजोग गावचे माजी सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Case) यांची 9 डिसेंबरला खून करण्यात आला. या हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय असलेले वाल्मिक कराड (Walmik Karad) यांच्यावर आरोप केला जात आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड फरार होता. मात्र आज 23 व्या दिवशी वाल्मिक कराड हा पुण्यातील सीआयडीच्या (Pune CID) कार्यालयात शरण आला. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी नवा दावा केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. 


भास्कर जाधव म्हणाले की, वाल्मिक कराड हा बीड प्रकरणातला महत्त्वाचा संशयित गुन्हेगार आहे. जी काही घटना घडली त्याचा कर्ता-करविता वाल्मीक कराड आहे, असे संपूर्ण महाराष्ट्र आक्रोश करून सांगत आहे. आमच्या पोलीस खात्याचं नाव खूप मोठं आहे. पण, नाव मोठं आणि लक्षण खोटं अशी परिस्थिती आज महाराष्ट्रात पोलीस खात्याची झाली आहे.  वाल्मिक कराडला शोधण्याकरता पोलिसांनी वेगवेगळी पथकं तयार केली, राज्यकर्त्यांनी मोठी आव्हान केली आणि पुण्यात स्वतः वाल्मीक कराड शरण येतो, सरेंडर होतो, पण पोलिसांच्या हाताला लागत नाही किंवा आजच तो शरण झाला यावरही शंका उपस्थित व्हायला निश्चितपणे जागा आहे. 


भास्कर जाधवांचा दावा


ते पुढे म्हणाले की, आजच आम्ही वर्तमानपत्रात असे वाचले की, काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री धनंजय मुंडे हे सह्याद्री अतिथीगृहावर दीर्घकाळ चर्चा करत होते. काल त्यांनी चर्चा केली आणि आज वाल्मिक कराड शरण व्हावा, हा योगायोग म्हणावा की पोलिसांच्या हाताला न लागताच तो स्वतःच पोलीस स्टेशनला जावा, हे सगळं घडवलेलं नाट्य आहे का? अशी शंका महाराष्ट्रातील जनतेच्या मनात येत आहे. यातून महाराष्ट्राची जनता नक्कीच योग्य तो बोध घेईल, असे भास्कर जाधव यांनी म्हटले आहे. 



शरण होण्यापूर्वी व्हिडिओ केला जारी


दरम्यान, वाल्मिक कराडने सीआयडी कार्यालयात शरण होण्यापूर्वी एक व्हिडिओ शेअर करून आपली बाजू मांडली. या व्हिडिओत त्याने म्हटले आहे की, मी वाल्मिक कराड, माझ्या विरोधात केज पोलीस स्टेशनमध्ये खोटी खंडणीची फिर्याद दाखल झाली आहे. मला अटकपूर्व अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस, पुणे पाषाण येथे सरेंडर होत आहे. संतोष देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील, त्यांना अटक करावी आणि फाशीची शिक्षा द्यावी. राजकीय रोषाने माझं नाव त्यांच्याशी जोडले जात आहे. पोलीस तपासाचे निष्कर्ष येतील त्यात मी जर दोषी दिसलो तर मला शिक्षा द्यावी, ती मी भोगायला तयार आहे, असं वाल्मिक कराडने स्वतः शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.


आणखी वाचा 


Walmik Karad Surrender : वाल्मिक कराड सीआयडीसमोर शरण, पुण्यातील कार्यालयाबाहेर येताच नेमकं काय घडलं?