मुंबई: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणावरुन महाराष्ट्रातील राजकीय वातावरण सध्या प्रचंड तापले आहे. याप्रकरणातील काही आरोपी आणि वाल्मिक कराड हे अद्याप फरार आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येला तब्बल 22 दिवस उलटूनही अद्याप पोलिसांना वाल्मिक कराड आणि संतोष देशमुख यांच्या उर्वरित मारेकऱ्यांना पकडण्यात यश आलेले नाही. या पार्श्वभूमीवर आता संतोष देशमुख हत्याप्रकरण सातत्याने लावून धरणारे भाजप आमदार सुरेश धस हे मंगळवारी मुंबईत येणार आहेत. सुरेश धस हे मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येला तीन आठवडे उलटून गेल्यानंतरही वाल्मिक कराड अद्याप फरार आहेत. सीआयडीकडून तपासात दिरंगाई होत असल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला आहे. यासाठी वाल्मिक कराड हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहेत. यावेळी सुरेश धस यांच्याकडून आणखी एक महत्त्वाची मागणी केली जाण्याची शक्यता आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांच्या नेमणूक करण्याची मागणी सुरेश धस करणार आहेत. ही मागणी देवेंद्र फडणवीस मान्य करणार का, हे पाहावे लागेल. सुरेश धस हे मंगळवारी दुपारी मुंबईत पोहोचतील. त्यानंतर ते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला कधी जातात आणि या भेटीत काय घडते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणात बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्याविरोधात आघाडी उघडली आहे. बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनीही याप्रकरणात आक्रमक भूमिका घेतली होती. तेदेखील सध्या मुंबईत आहेत.
संतोष देशमुख यांची हत्या वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरुन झाली, असा आरोप होत आहे. वाल्मिक कराड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या तपासाबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. कालपासून वाल्मिक कराड हे पोलिसांना शरण येणार असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. मात्र, वाल्मिक कराड हे अद्याप पोलीस किंवा सीआयडी पथकासमोर हजर झालेले नाहीत. या सगळ्या घटनांमुळे बीडमध्ये सध्या प्रचंड तणाव आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख प्रकरणातील आरोपींची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले होते. वाल्मिक कराड यांच्यावर पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्याकडून खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोष देशमुखांच्या भावाकडून कोर्टात रिट याचिका
संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात एक याचिका दाखल केली. यामध्ये धनंजय देशमुख यांनी संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाचा नि:पक्ष तपासासाठी धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरुन दूर करण्याची मागणी केली. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे समाजमाध्यमांवर अनेक फोटो आहेत. यावरुन त्यांच्यातील हितसंबंध स्पष्ट होतात. त्यामुळे संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा तपास होईपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरुन बाजूला करण्यात यावे, अशी मागणी संबंधित याचिकेत करण्यात आली आहे.
आणखी वाचा