मुंबई: बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांच्याविरोधात दंड थोपटणारे पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीसाठी विजय शिवतारे हेलिकॉप्टरने मुंबईत आले होते. परंतु, त्यांना तब्बल 7 तास वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी ताटकळत राहावे लागले. या गोष्टीची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांच्याशी तब्बल तासभर चर्चा केली. या बैठकीनंतर वर्षा बंगल्यावरुन बाहेर पडताना विजय शिवतारे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तेव्हा विजय शिवतारे यांनी पुढील दोन दिवस सबुरीचे धोरण बाळगणार असल्याचे संकेत दिले.


मी बारामतीमधील नगरसेवक, मोठे पदाधिकारी, जिल्हाधिकारी, तालुकाप्रमुख असे तब्बल 150 प्रमुख लोकप्रतिनिधी घेऊन वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी आलो होतो. आजच्या बैठकीत आम्ही भाईंना समजावलं, आमच्याकडे असणारा त्रास त्यांना सांगितला. मी माझी भावना मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोर मांडली. सगळ्या कार्यकर्त्यांनीही आपापले म्हणणे मुख्यमंत्र्यांसमोर मांडले. आता त्यांनी संबंधितांशी चर्चा करण्यासाठी दोन दिवसांचा अवधी मागून घेतला आहे. त्यानंतर पुन्हा निवडक पदाधिकाऱ्यांसोबत माझी आणि एकनाथ शिंदे यांची बैठक होईल. तोपर्यंत शांत राहण्यास मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे, अशी माहिती विजय शिवतारे यांनी दिली.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितल्यानंतर तुम्ही बारामतीमधून लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय मागे घेणार का, असा प्रश्न यावेळी विजय शिवतारे यांना विचारण्यात आला. त्यावर शिवतारे यांनी म्हटले की, मी गेल्या 4 दिवसांपासून लोकसभा निवडणूक लढणार असल्याचे सांगत आहे. मुख्यमंत्र्यांनी माझं म्हणणं ऐकून घेतलं आहे. बारामतीमधून उमेदवारी मागे घ्यायला अजून लोकसभेचे फॉर्म भरलेले नाहीत किंव उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत नजीक येऊन ठेपलेली नाही. त्यामुळे मी बारामीत मतदारसंघातून उमेदवारी मागे घेणार की नाही, हे ठरवण्यासाठी बराच अवधी आहे. आता एकनाथ शिंदे यांना इतर लोकांशी चर्चा करण्यासाठी दोन दिवसांचा वेळ हवा असेल. त्यानंतर मुख्यमंत्री पुन्हा काय बोलतात, हे पाहावे लागेल. तेव्हा निवडक पदाधिकाऱ्यांसोबत मी पुन्हा बैठकीला येईन, असे विजय शिवतारे यांनी सांगितले.


आणखी वाचा


अजितदादांशी पंगा, मुख्यमंत्र्यांचा इंगा, विजय शिवतारे 7 तास वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी ताटकळले