पुणे : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचे (Shivsena) नेते तथा माजी आमदार विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी माघार घेतली आहे. मी बारामती (Baramati) मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक (Loksabha Election) लढवणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलंय. काहीही झालं तरी मी माघार घेणार नाही, असं शिवतारे गेल्या अनेक दिवसांपासून सांगत होते. हा दावा करताना ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर तसेच पवार कुटुंबावर सडकून टीका करत होते. मात्र आता माघार घेतल्यानंतर शिवतारे यांची चांगलीच गोची झाली आहे. अजित पवार यांना उर्मट म्हणणारे शिवतारे आता त्यांच्याच पक्षाच्या उमेदवाराला निवडून द्या, असे आवाहन करत आहेत.
आधी पवार कुटुंबावर सडकून टीका
बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवण्यावर शिवतारे ठाम होते. त्यांनी माघार घ्यावी, यासाठी मुख्यमंत्री शिंदे हरतऱ्हेने प्रयत्न करत होते. शिवतारे आणि शिंदे यांच्यात या मुद्द्यावरून अनेकवेळा बैठकही झाली. मात्र मी निवडणूक लढवणारच अशी भूमिका त्यांनी घेतली होती. त्यांनी बारामतीच्या मतदारसंघात आपले दौरेही चालू केले होते. आपल्या भाषणांत ते पवार कुटुंब तसेच अजित पवार यांच्यावर सडकून टीका करत होते. अजित पवार बारामतीतून निवडून येऊ शकत नाहीत, असं शिवतारे म्हणायचे. पवारांवर टीका करताना तर त्यांनी विंचू महादेवाच्या पिंडीवर बसला आहे, असंही विधान केलं होतं. आता मात्र शिवतारे नरमले आहेत.
प्रश्नांची उत्तरं देताना शिवतारेंची अडचण
निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर शिवतारे यांनी एबीपी माझाशी संवाद साधला. यावेळी मात्र अजित पवार यांच्याविषयी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देताना त्यांची चांगलीच अडचण झाली. तुम्ही आता सुनेत्रा पवार यांचा प्रचार करणार का? असा प्रश्न शिवतारे यांना विचारण्यात आला. यावर बोलताना मी महायुतीचा प्रचार करणार असं म्हणत त्यांनी काढता पाय घेतला.
5 लाख मतदारांना तोंड द्यावं लागणार
प्रचार करताना मी बारामतीकरांना पवारांव्यतिरिक्त तिसरा पर्याय देत आहे, असा दावा त्यांनी केला होता. साधारण 5 लाख मतदार पवारांना विरोध करतात, असा दावा ते करायचे. आता मात्र याच पाच लाख मतदारांना त्यांना तोंड द्यावे लागणार आहे. ता माघार घेतल्यामुळे याच पवार घराण्यातील सुनेत्रा पवार यांचा प्रचार शिवतारे करणार आहेत. त्यामुळे सध्या त्यांची अडचण झाली आहे.
हेही वाचा >>
...तर 10 ते 20 खासदार पडले असते, शिवतारेंनी सांगितलं बारामतीतून माघार घेण्यामागचं नेमकं कारण