सासवड : अखेर विजय शिवतारेंनी (Vijay Shivtare) बारामती लोकसभेतून ( Baramati Loksabha Constituency) माघार घेतली आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळेंना दिलासा मिळाला आहे. बारामातीतून निवडणूक लढवण्याचा निर्धार शिवतारेंनी केला होता. मात्र त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी विजय शिवतारेंशी (Vijay Shivtare) मुंबईत बैठक झाली आणि त्यानंतर शिवतारेंचं बंड थंड होणार?, अशा चर्चा रंगली. अखेर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या निवडणुकीतून माघार घेतली आहे.
विजय शिवतारे काय म्हणाले?
'मी महिलांसमोर उत्स्फूर्तपणे बोललो. 5 लाख 50 हजार पवार विरोधी मतं कोणाला जाणार, यासाठी मी तिसरा पर्याय या मतदारांसमोर ठेवला आणि ही लोकसभा निवडणूक लढायचीच ही घोषणा केली होती. आता कार्यकर्त्यांशी चर्चा केली, त्यांच्या तिखट प्रतिक्रिया ही उमटल्या. पण मी लढल्यावर काय होईल, यावर ही कारणमीमांसा झाली. पण मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्याशी बैठक झाली. मी इतके दिवस मुख्यमंत्र्यांचे ऐकत नव्हतो, ते रागावले ही माझ्यावर. मला एक फोन ही आला, मुख्यमंत्री अडचणीत आहेत, त्यांना आपल्याला सांभाळून घ्यावं लागेल. 15 ते 20 लोकसभा उमेदवार पडू शकतात. असं मला सांगण्यात आलं. यामुळं महायुतीला मोठा फटका बसणार होता. नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्याचं स्वप्न पूर्ण करायचं आहे' , असं ते म्हणाले.
एका फोनमुळे निर्णय बदलला!
'ज्या दिवशी मी निवडणूक लढणार असा निर्धार केला त्यादिवसांपासून पुढील 15 दिवस ही निवडणूक लढायचीच असा ठाम निर्णय आम्ही घेतला होता. त्यानंतर आमदार, खासदार झाल्यावर काय केलं असतं वगरे चर्चा झाल्या. हे सगळं घडत असताना माझी उपमुख्यमंत्र्यांशी फोनवर चर्चा झाली होती. मुख्यमंत्र्यांशी दोनवेळा चर्चा झाली तरीही मी निर्णय बदलला नव्हता. बारामती लोकसभेच्या सगळ्या विधानसभेच्या लोकांचा पाठिंबा दिसला आणि त्यामुळे मी निवडणूक लढवायचं ठरवलं होतं. मात्र मुख्यमंत्र्याच्या ओएसडीचा एक फोन 26 तारखेला आला आणि त्यांनी काही गोष्टी सांगितल्या. महायुतीची आणि मुख्यमंत्र्यांची अडचण होत असल्याचं सांगितलं. राज्याचं हित आणि मोदींना पंतप्रधान बनवण्यासाठी मी माघार घेतली, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
इतर महत्वाची बातमी-