पुणे : राज्याच्या राजकारणात आता सर्वच राजकीय पक्षांना विधानसभेचे वेध लागले असून आगामी विधानसभेसाठी आपआपला मतदारसंघ सुरक्षित करण्यासाठी नेतेमंडळी कामाला लागली आहे. महाविकास आघाडी व महायुती म्हणून राजकीय पक्ष एकत्र आले आहेत. त्यामुळे, जागावाटपात प्रत्येक मतदारसंघात रस्सीखेंच दिसून येणार आहे. त्यातच, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसोबत सत्तेत सहभाग घेतल्याने आता महायुतीत जागावाटपावरुन संघर्ष पाहायला मिळत आहे. आंबेगाव विधानसभा मतदारसंघाबाबत दिलीप वळसे पाटील यांनी भूमिका जाहीर केल्यावर आता शिवसेना शिंदे गटाने या जागेवर दावा केलाय. 


नाईलाजास्तव निवडणूक लढण्यापेक्षा दिलीप वळसेंनी (Dilip walase) शिवसेनेला जागा सोडावी, असे म्हणत आंबेगाव येथील शिवसेना (Shivsena) शिंदे गटाने नवी राजकीय खेळी केल्याचं दिसून येत आहे. माझी कन्या निवडणूक (Vidhansabha) लढवायला अजिबात तयार नाही त्यामुळे नाईलाजाने मलाच निवडणूक लढवावी लागेल", असे वळसे पाटील यांनी म्हटले होते. त्यानंतर, आता शिंदे गटाच्या सचिन बांगर यांनी ही जागा शिवसेनेला सोडण्याची मागणी केली आहे. 


मंत्री दिलीप वळसे पाटलांनी नाईलाजास्तव निवडणूक लढू नये, त्यापेक्षा आंबेगाव विधानसभेची जागा शिवसेनेला सोडावी. वळसे पाटलांनी मोठं मन दाखवण्याची इच्छा शिंदे गटाने व्यक्त केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काल आंबेगावमध्ये घेतलेल्या महायुतीच्या बैठकीवर बहिष्कार घातल्यानंतर आज ही नवी खेळी शिंदे गटाने खेळली आहे. त्यासाठी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे ही तशी मागणी करण्यात आली आहे. काल उपमुख्यमंत्री अजित पवारांची जनसन्मान यात्रा आंबेगाव विधानसभेत आली होती. तेंव्हा माझी मुलगी विधानसभेची निवडणूक लढायला तयार नाही. त्यामुळे, मला नाईलाजास्तव आंबेगावची निवडणूक लढावी लागेल, असं वक्तव्य वळसे पाटलांनी केलं होतं. हाच धागा पकडत आंबेगाव शिंदे गटाच्यावतीने सचिन बांगर यांनी जागा शिवसेनेला सोडण्याची मागणी केली आहे. यानिमित्ताने आंबेगावमध्ये भगवा फडकविण्याचं दिवंगत बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न ही पूर्ण होईल, असेही बांगर यांनी म्हटले. त्यामुळे, आंबेगावच्या जागेवरुन महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे. आधीत महायुतीत काही आलबेल नसल्याच्या चर्चा येत असताना, आता आंबेगाव मतदारसंघावरुन महायुतीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. 


काय म्हणाले होते वळसे पाटील


"विधानसभेची निवडणूक (Maharashtra Assembly Election) लागणार आहे. विधानसभेची निवडणूक आम्हाला मोठ्या ताकतीने आणि हिंमतीने लढवायची आहे. जिंकायचे पण आहे आणि ते आपण जिंकणारच आहोत. काही लोक मुद्दाम अशी बातमी पसरवत आहेत की दिलीप वळसे पाटील निवडणूक लढवणार नाहीत, तर त्यांची कन्या लढवणार आहे. माझी कन्या निवडणूक लढवायला अजिबात तयार नाही त्यामुळे नाईलाजाने मलाच निवडणूक लढवावी लागेल", असे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) म्हणाले. ते मंचर येथील सभेत बोलत होते.