मुंबई: रवींद्र चव्हाण कुचकामी मंत्री आहेत, त्यांचा राजीनामा घ्या, अशा टीका करणारे शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांना भाजपकडून सडेतोड प्रत्युत्तर देण्यात आले आहे. भाजपच्या संयमाला दुबळेपणा समजू नका. महायुतीची गरज एकट्या भाजपला नाही, असा गर्भित इशारा भाजपचे आमदार आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या निकटवर्तीय नेत्यांपैकी एक असलेल्या प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी दिला आहे. त्यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना रामदास कदम यांना खडे बोल सुनावले.
रामदास कदम हे महायुतीमधील ज्येष्ठ नेते आहेत. मात्र, त्यांचे रवींद्र चव्हाण यांच्याबद्दलचे वकत्व्य अपरिपक्व म्हणावे लागेल. रामदास कदम यांना काही समस्या असेल तर चार भिंतीच्या आत ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासमोर मांडायला पाहिजे होती. पण त्यांचा स्वभाव हा खळबळजनक बोलण्याचाच आहे. महायुतीचा धर्म हा पाळलाच गेला पाहिजे. अन्यथा आरे ला कारे आम्हालाही करता येते, असा इशारा प्रवीण दरेकर यांनी दिला. रत्नागिरीत आमचे तीन आमदार आहेत, ठाण्यात नरेश म्हस्केला आमच्या पक्षाने खासदार केले, रवींद्र वायकरांना आमच्या लोकांनी विजयी केले, नाशिकची सीटही आम्ही शिंदे गटाला दिली. त्यामुळे तुम्ही उणीदुणी काढत असाल तर आम्हीही तयार आहोत, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले. महायुतीची गरज ही सर्वांना आहे. एवढं चांगलं वातावरण असताना मिठाचा खडा टाकू नये. महायुती फक्त भाजपची गरज नाही. आमचे कार्यकर्तेही मनावर दगड ठेवून महायुतीत लढत आहेत, असे वक्तव्य दरेकर यांनी केले.
रामदास कदम यांना वैयक्तिक कारणातून वैफल्य आले आहे. रामदास कदम यांचा मुलगा जिकडे आमदार आहे, तिकडे परिस्थिती अशी आहे की, भाजप नसेल तर त्यांना निवडून येणे अवघड आहे. त्यांच्या मुलाला मंत्री व्हायचे होते. त्यामुळे रामदास कदम अस्वस्थ आणि बैचेन आहेत. ते राजकीय पटलावरुन गायबही आहेत. या सगळ्या वैफल्यातून ही सगळी खदखद बाहेर येत आहे. भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे. राज्यभरात आमचं नेटवर्क आणि संघटना आहे. त्यामुळे आमच्या संयमाला दुबळेपणा समजू नका, असेही प्रवीण दरेकर यांनी म्हटले.
रामदास भाईंना दरवेळी भाजपला वेठीला धरु नये: देवेंद्र फडणवीस
अशाप्रकारचे आरोप करणे कुठल्या युतीधर्मात बसते. रामदास भाईंचे काही म्हणणं असेल तर त्यांनी अंतर्गत बैठकीत मांडलं पाहिजे. अशावेळी प्रत्येकवेळी भाजपच्या नेत्यांना वेठीस धरणे यातून एक चांगली भावना तयार होत नाही. मी आता रामदास भाईंचे म्हणणे जाणून घेईन, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
रामदास कदम नेमकं काय म्हणाले?
रवींद्र चव्हाण कुचकामी मंत्री आहेत, असा हल्लाबोल करत देवेंद्र फडणवीसांनी रवींद्र चव्हाणांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी रामदास कदमांनी केली आहे. गेल्या 14 वर्षापासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम होत नाही. चाकरमान्यांचे हाल होत आहेत. समृद्धी महामार्गाचे काम तीन वर्षात पूर्ण होते. मग मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण का होत नाही? असा प्रश्न रामदास कदमांनी उपस्थित केला. रवींद्र चव्हाणांना शिवसेनेची एलर्जी आहे. रवींद्र चव्हाण कुचकामी मंत्री आहेत, अशी टीका रामदास कदम यांनी केली.
आणखी वाचा
महेंद्र थोरवेला मी मोजत नाही, सुनील तटकरेंचा हल्लाबोल, अजित पवारांचंही एका वाक्यात उत्तर!