मुंबई : विदर्भातील जागांवरून चालू असलेला महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) संर्घष अद्याप सुटलेला नाही. महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेला (Uddhav Thackerya Shivsena) विदर्भात एकूण 12 जागा हव्या आहेत. तर विदर्भात आमचीच ताकद जास्त असून आम्ही एवढ्या जागा देणार नाही, अशी काँग्रेसची भूमिका आहे. विशेष म्हणजे हो दोन्ह पक्ष आपापल्या भूमिकेवर ठाम आहेत. म्हणूनच गेल्या काही दिवसांत मविआच्या अनेक बैठका झाल्या मात्र त्यातून या मुद्द्यावर अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही.
विशेष म्हणजे या वादानंतर ठाकरेंच्या शिवसेनेने ताठर भूमिका घेतलेली आहे. आम्हाला काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील, असे सूतोवाच ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी केले आहे. त्यानंतर आता हा गुंता सोडवण्यासाठी काँग्रेसने मोठा निर्णय घेतला आहे. काँग्रेसने हा वाद मिटवण्याची जबाबदारी पक्षातील वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर सोपवली आहे.
दोन ते तीन दिवसांत काँग्रेसची यादी येणार
तत्पूर्वी काँग्रेस पक्षाची 21 ऑक्टोबर रोजी बैठक पार पडली आहे. या बैठकीत वेगवेगळ्या जागांसाठी काही नावं निश्चित करण्यात आली. याबाबत खुद्द बाळासाहेब थोरात यांनी माहिती दिली आहे. आगामी दोन ते तीन दिवसांत उमेदवारांची नावं घोषित केली जातील, असे थोरात यांनी सांगितले. तसेच 22 ऑक्टोबर रोजी काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची एक बैठक होईल. त्या बैठकीत उर्वरित नावं निश्चित केली जातील, असेही थोरात यांनी सांगितले.
गुंता सोडवण्याची जबाबदारी थोरात यांच्यावर
महाविकास आघाडीतील जाागावाटपासंदर्भातील कलह अद्याप मिटलेला नाही. त्यामुळे काँग्रेसला हा मुद्दा लवकर निकाली काढायचा आहे. त्यामुळे जागावाटपाचा मुद्दा मार्गी लावण्याची जबाबदारी आता काँग्रेसने बाळासाहेब थोरात यांच्यावर सोपवली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मला उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याशी बोलण्यास सांगितले आहे. त्यामुळे मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे, असे खुद्द थोरात यांनीच सांगितले आहे.
आज पुन्हा महाविकास आघाडीची बैठक
महाविकास आघाडीची सध्याची स्थिती म्हणजे तिढा म्हणता येणार नाही. आमच्यात चर्चा होईल. चर्चेतून मार्ग निघेल. 22 ऑक्टोबरच्या दुपारी 3 वाजता आम्ही पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे नेते चर्चेला बसणार आहोत, असेही थोरात यांनी सांगितले.
हेही वाचा :