मुंबई : मुंबई पदवीधर मतदारसंघ  (Mumbai Graduate Constituency Election) हा परंपरेने शिवसेनेची जागा असून आपण या ठिकाणाहून इच्छुक असल्याचं वक्तव्य शिंदे गटाचे नेते दीपक सावंत (Dr. Deepak Sawant) यांनी केलं. आपण या आधीही विधानपरिषदेवर होतो, त्यामुळे ही जागा महायुतीतील शिवसेनेने लढवावी असा आपला आग्रह असल्याचंही दीपक सावंत म्हणाले. मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून या आधीच अनिल परब (Anil Parab) यांचे नाव जाहीर करण्यात आलं आहे. राज्यातील विधानपरिषदेच्या चार जागांसाठी येत्या 26 जून रोजी निवडणूक होणार असून 1 जुलै रोजी त्याचा निकाल आहे.  


दीपक सावंत म्हणाले की, मुबई पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी मी इच्छुक आहे. परंपरेने मुंबई पदवीधर मतदारसंघाची जागा महायुती शिवसेनेनेच लढवावी असा आग्रह आहे.  मी आधीसुद्धा विधानपरिषदेवर होतो. ही जागा तशी पाहिली तर शिवसेनेची आहे आणि परंपरा विचारात घेतली तर ही जागा शिवसेनेनेच महायुतीत लढवावी. मात्र भाजप आणि शिवसेना मिळून या संदर्भात निर्णय घेतील.


मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब रिंगणात


मुंबई पदवीधर मतदारसंघांमध्ये याआधी शिवसेना ठाकरे गटाचे विलास पोतनीस हे आमदार होते. आता मुंबई पदवीधर मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांना उमेदवारी देण्यात आली आहे.


महायुतीकडून अद्याप उमेदवार जरी जाहीर केला नसला  तरीही जागा शिवसेनेची असल्याने शिवसेना शिंदे गटाने उमेदवार द्यावा अशी मागणी शिवसेनेच्या नेत्यांची आहे. त्यामुळे माजी मंत्री डॉ. दीपक सावंत हे मुंबई पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून त्यांच्या उमेदवारीची चर्चा आहे. दुसरीकडे या जागेसाठी भाजपसुद्धा महायुती उमेदवार देण्यासाठी आग्रही असल्याचे बोलले जातंय.


अनिल परब हे शिवसेनेचे विधानपरिषदेत प्रतिनिधित्व करतात. महाविकास आघाडी सरकारमध्ये परिवहन मंत्री म्हणून त्यांनी यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली होती. उद्धव ठाकरे यांच्या मर्जीतील नेता म्हणून त्यांची ओळख आहे. ते रत्नागिरी जिह्याचे पालकमंत्रीही होते. अनिल परब हे 2012 आणि 2018 मध्ये विधानपरिषदेवर निवडून आले होते. त्यांना पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाकडून विधान परिषदेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. 


अनिल परब यांचा  विधानपरिषदेच्या आमदारकीचा कार्यकाळ सत्तावीस जुलै रोजी पूर्ण होत आहे त्यामुळे पुन्हा एकदा त्यांना उमेदवारी देऊन विधान परिषदेच्या रिंगणात शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आले आहे.


ही बातमी वाचा: