नांदेड : विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या असून महायुती व महाविकास आघाडीकडून प्रचाराचा नारळही फोडला जात आहे. विशेष म्हणजे, अनेक मतदारसंघात इच्छुक उमेदवारांनी पक्षश्रेष्ठींकडे धावाधाव सुरू केली आहे. दुसरीकडे राज्यात विविध राजकीय पक्षातील नेत्यांचे महाराष्ट्र दौरे सुरू झाले आहेत. तर, सध्या आरक्षणाचा मुद्दा तापला असून मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी शांतता रॅलीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात केली आहे. आपल्या रॅलीतून ते सत्ताधारी व विरोधक दोघांनाही लक्ष्य करत आहेत. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी आरक्षण बचाव यात्रा सुरू केली असून त्यांनी थेट मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावरच निशाणा साधला आहे. तसेच, मराठा समजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास आपला विरोध असल्याचंही त्यांनी म्हटलं. यादरम्यान, आज नांदेडमध्ये एका पत्रकाराच्या प्रश्नावर प्रकाश आंबडेकर संतापल्याचं पाहायला मिळालं. तसेच, तुझं जेवढं वय नाही, तेवढी माझी पत्रकारीतेत हयात गेलीय, असेही त्यांनी पत्रकाराला सुनावलं.


कुणबी मराठा डबल भूमिका घेत असेल, तर विधानसभा निवडणुकीत वंचित आघाडी एकही कुणबी मराठा उमेदवार देणार नाही आहे का? असा प्रश्न पत्रकाराने प्रकाश आंबेडकर यांना विचारला होता. त्यावरुन, आंबेडकर चिडल्याचे दिसून आले. तुझं जेवढं वय नाही ना, तेवढी तुझ्या ह्या पत्रकारितेत माझी गेलेली आहे. हे पेड विचारणारे प्रश्न आहेत, हे मला नका विचारु कारण मी राजकारणातला बाप आहे, असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकाराच्या प्रश्नावर संताप व्यक्त केला. या घटनेचा व्हिडिओही आता सोशल मीडियातून समोर आला आहे. 


मराठा समाजाचा ओबीसी आरक्षणामध्ये कायदेशीररित्या समावेश होऊ शकत नाही, तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या सगेसोयरे या मागणीला देखील आमचा विरोध आहे. कुणबी हा ओबीसीत आहे. त्यामुळे त्यांनी जर कागदपत्र दाखल केले तर त्यांना आरक्षण मिळू शकेल, असेही ते आंबेडकरानी म्हटले होते. तर, आगामी विधानसभा निवडणुकीत कुणबी मराठा उमेदवार उभा राहिल्यास त्याला मतदान करु नका, असे आवाहनही प्रकाश आंबेडकरांनी केलं होतं. त्यानंतर, आज पत्रकाराने कुणबी मराठा उमेदवाराच्या अनुषंगाने प्रश्न विचारला असता, प्रकाश आंबेडकर चांगलेच भडकल्याचं पाहायला मिळालं.  


काय म्हणाले होते प्रकाश आंबेडकर


वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी वाशिमच्या पोहरादेवी येथे खळबळजनक विधान केलं होतं. या निवडणुकीत कुणबी मराठा उमेदवाराला मतदान करू नका असं आवाहनही त्यांनी ओबीसींना केलं. विधानसभा ठरावाच्या वेळी कुणबी समाजाची पाटीलकी जागी झाली तर ते आपल्या बाजूने उभारणार नाहीत. कारण इथला कुणबी मराठा डबल भूमिका घेतो. आपल्यामध्ये बसला की स्वत:ला ओबीसी म्हणवतो आणि पाटलांमध्ये बसला की मराठा म्हणतो. त्यामुळे या निवडणुकीत खूणगाठ बांधा मी ओबीसीलाच मतदान करणार.. असे आवाहन प्रकाश आंबेडकरांनी केले होते.