मुंबई: देशभरात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीची जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. या सगळ्यात महाविकास आघाडी (MVA) आणि वंचित बहुजन आघाडीची (VBA) युती होणार की नाही, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी वंचितने लोकसभेच्या 27 जागांवर तयारी केल्याचे वक्तव्य केल्यानंतर मविआ आणि वंचितची युती जवळपास फिस्कटल्याची चर्चा होती. प्रकाश आंबेडकर यांनीही वंचितच्या नेत्यांना मविआच्या कोणत्याही व्यासपीठावर जाऊ नये, अशा सूचना दिल्या होत्या. त्यामुळे प्रकाश आंबेडकर पुन्हा एकदा स्वबळावर लोकसभेच्या रिंगणात (Loksabha Election 2024) उतरतील, अशी शक्यता निर्माण झाली होती. परंतु, बुधवारी मुंबईतील फोर सिझन्स हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीला प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थिती लावल्याने मविआ आणि वंचितच्या युतीच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत. या बैठकीतून बाहेर पडल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी केलेले वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.


प्रकाश आंबेडकर बैठकीतून बाहेर पडल्यानंतर त्यांना पत्रकारांचा गराडा पडला. बैठकीत जागावाटपाबाबत काय ठरले, असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांना विचारण्यात आला. त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले की, सध्या मी काहीही बोलणार नाही. तुम्हाला नंतर ब्रिफिंग होईल. यानंतर आंबेडकर यांना तुम्ही मविआसोबत एकत्र लढणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर आंबेडकरांनी म्हटले की, मी अजूनही कशात नाही. पुढच्या बैठकीमध्ये सगळं ठरेल. तरीही पत्रकारांनी तुम्ही बैठकीबाबत समाधानी आहात का, असा प्रश्न आंबेडकरांना विचारला. त्यावर  आंबेडकरांनी, 'तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरुन काय वाटतं?' असा प्रतिप्रश्न केला. त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी हसत-हसत काढता पाय घेतला.



प्रकाश आंबेडकर आणि आमचं एका गोष्टीवर एकमत झालंय... संजय राऊत नेमकं काय म्हणाले?


मविआच्या जागावाटपाच्या आजच्या बैठकीला उद्धव ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरात, संजय राऊत आणि प्रकाश आंबेडकर हे प्रमुख नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. बैठकीत जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला की नाही,याबाबत राऊतांनी स्पष्टपणे बोलण्यास नकार दिला. मात्र,  चार पक्षांमध्ये उत्तम चर्चा झाली, 48 जागांवर चर्चा झाली, ही चर्चा सकारात्मक झाली. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेमध्ये कोणतेही मतभेद नाहीत, एकाही जागेवर मतभेद नाहीत. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीसोबतही चर्चा झाली. त्यांनी एक प्रस्ताव दिलेला आहे, त्यावरही चर्चा झाली. आमची सर्वांची इच्छा आहे, प्रकाश आंबेडकरांची वंचित आघाडी आमच्या सोबत असावी. आम्ही सर्वांनी एकत्र निवडणुकीला सामोरं जावं हे ठरलेलं आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.


आणखी वाचा


मोठी बातमी : प्रकाश आंबेडकरांचं एका बाबतीत समाधान, संजय राऊतांचा दावा, वंचितने ठेवलेला प्रस्ताव मविआच्या अडचणीचा ठरणार?