मुंबई :  विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election)  पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी दौरे, सभा, संवाद सुरु केले आहेत. दरम्यान, मध्यरात्री उशीरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार प्रफुल्ल पटेल, मंत्री दादा भुसे तसेच मंत्री उदय सामंत यांच्यात वर्षा बंगल्यावर महत्वाची बैठक पार पडली आहे. मात्र या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनुपस्थित असल्याने विविध चर्चांना उधाण आलं आहे. बहुदा ही पहिलीच बैठक असावी. ज्यात स्वत: फडणवीस हे उपस्थित नाहीत.


विधानसभेच्या निवडणुकीचे बिगुल कुठल्याही क्षणी वाजू शकतात. त्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कामाला लागले आहेत.  केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यात  झालेल्या बैठकित लोकसभेत झालेल्या चुका टाळा, युतीतील जागांचा तिढा हा सामोपचाराने सोडवण्याच्या सूचना तर दिल्या.  मात्र विरोधकाचा खोटा नेरेटिव्ह खोडून काढत शासनाने आखलेल्या चांगल्या योजना लोकांपर्यंत पोहचवण्याच्या सूचनाही शहा यांनी दिल्याची माहिती समोर आली. त्यानंतर शिवसेनेकडून घरोघरी जाऊम मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब अभियान सुरू करत प्रचाराचा नारळ फोडला. स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातील त्याच्या विधानसभा क्षेत्रात नागरिकांच्या घरी जाऊन भेट घत होते. ही योजना 1 कोटीहून अधिक कुटुंबियांपर्यंत पोहचवण्याचा त्यांचा मानस आहे.


राजकीय चर्चांना उधाण 


 मंत्री दादा भुसे, उदय सामंत आणि माजी मंत्री विजय शिवतरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण कुटुंब अभियानाबाबत आखलेला अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यासाठी गेले असता. चौघांमध्ये वर्षा बंगल्यावर बैठक सुरू होती. नेमकी याच वेळी  वर्षावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रफुल पटेल यांची 'एन्ट्री' झाली. वर्षावरील मुख्यमंत्र्यांचा गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर दादा आणि प्रफुल पटेलही या बैठकीत सहभागी झाले. या अभियानाच्या प्रचार आणि प्रसारासंदर्भात सुरू असलेल्या या बैठकीला महायुतीतील दोन प्रमुख पक्षाचे नेते उपस्थित होते. मात्र भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईत असूनही उपस्थित नसल्याने विविध राजकिय चर्चा रंगल्याचे पहायला मिळाले. 


देवेंद्र फडणवीस यांच्याविना बैठक


मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये वर्षावर आतापर्यंत रात्री झालेल्या बैठकांमध्ये देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती ही कायम असायची. बंद दाराआड तिघांमध्ये तासनतास चर्चा व्हायची. मात्र काल देवेंद्र फडणवीस यांच्याविना झालेली ही पहिलीच बैठक होती. कालच्या बैठकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस ज्या ज्या जागांवर आमने सामने येत आहेत अशा जागांवर प्रामुख्याने चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहेत. त्यात मुंबई, पुणे, नाशिक आणि पश्चिम महाराष्ट्रातील काहीजागांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.


नेमकं महायुतीत चाललयं काय?


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अभियान, जागा वाटपांचा समपोचाराने तिढा सोडवण्या संदर्भातील बैठकीत महायुतीतील प्रमुखनेते देवेंद्र फडणवीसच उपस्थित नसल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. विशेषता: देवेंद्र फडणवीस हे मुंबईत असूनही बैठकीला नव्हते. नेमकं महायुतीत चाललयं काय असा प्रश्न आता उद्भवू लागला आहे. या पूर्वीही या योजनांच्या जाहिरातीवरून युतीतील प्रमुख नेत्यांचे फोटो नसल्यावरून चर्चा रंगल्या असताना. काल झालेल्या बैठकीत देवेंद्रजीची अनुउपस्थिती लक्ष वेधणारी आहे. यावरून युतीत सर्व काही अलबेल का ? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.