Uttam Jankar and Dhairyashil Mohite Patil, Jaysinh Mohite Patil : माळशीरमधील मोहिते पाटील (Mohite Patil)  घराणे आणि धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर (Uttam Jankar) यांच्यातील 30 वर्षांचे वैर संपुष्टात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तम जानकर आणि मोहिते पाटील घराण्याने एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तम जानकर यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या उपस्थितीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे दोन्ही घराण्यातील तब्बल 30 वर्षांचे वैर संपुष्टात आले आहे. माढाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील, उत्तम जानकर, महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते वेळापूरमध्ये एकत्र आलेले पाहायला मिळाले. यावेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही उपस्थित होते. 


माढ्याचे समीकरण बदलले


माढा लोकसभा मतदारसंघात भाजपला मोठे धक्के बसले आहेत. कारण पहिल्यांदा मोहिते पाटलांचे संपूर्ण घराणे सोडून गेले. त्यानंतर भाजपने मोहिते पाटलांचे विरोधक उत्तम जानकर यांना गळाला लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, भाजपचे प्रयत्न सपशेल अपयशी ठरले आहेत. मोहिते पाटलांना उत्तम जानकरांचे मन वळवण्यात यश आले आहे. लोकसभा निवडणुकीत उत्तम जानकर मोहिते पाटलांना मदत करतील. त्यानंतर विधानसभेला मोहिते पाटील उत्तम जानकरांना मदत करतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या माढा लोकसभा मतदारसंघातील अडचणी वाढताना दिसत आहेत. 


माढ्यात धैर्यशील मोहिते विरुद्ध रणजित निंबाळकर सामना 


माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांचा सामना भाजपच्या रणजित निंबाळकर यांच्याशी असणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटलांनी रणजित निंबाळकरांना साथ दिली. त्यामुळेच ते निवडून आले असं बोललं जात आहे. मात्र, आता मोहिते पाटलांनीच निंबाळकरांच्या नावाला विरोध करुनही त्यांना उमेदवारी दिली. त्यामुळे मोहिते पाटलांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत भाजपला धोबिपछाड दिली आहे. जानकर यांच्या राष्ट्रवादीमध्ये येण्याने मोहिते पाटलांना माळशीरसमधून दीड लाखांपर्यंत लीड मिळेल, असा विश्वास जयसिंह मोहिते पाटील यांनी व्यक्त केला होता. त्यामुळे एकंदरीत भाजपच्या माढ्यातील अडचणी वाढल्याचे चित्र आहे. 


फडणवीसांची प्रयत्न अपयशी 


भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तम जानकर यांना आपल्याकडे वळवण्यासाठी प्रयत्न केले होते. मोहिते पाटलांविरोधात काम करण्यासाठी जानकर यांना आमदारकीचे आश्वासनही देण्यात आले होते. मोहिते पाटील गेले आता रान मोकळं आहे. ऑगस्टमध्ये विधानसभा निवडणूक लागेल. तेव्हा तुम्हाला आमदार केलं जाईल, असं देवेंद्र फडणवीस उत्तम जानकर यांना म्हणाले होते. मात्र, उत्तम जानकरांनी फडणवीसांची ऑफर धुडकावून लावली आहे. त्यामुळे मोहिते पाटलांची ताकद वाढणार असून त्यांची रणनिती यशस्वी ठरली आहे, असं बोललं तर वावगं ठरणार नाही. 


इतर महत्वाच्या बातम्या


Uttam Jankar and Mohite Patil : माढ्यात शरद पवारांकडून फडणवीसांचा करेक्ट कार्यक्रम, उत्तम जानकर तुतारी हाती घेण्याच्या तयारीत