संगमनेर : संगमनेरमध्ये (Sangamner) झालेल्या हिंसक प्रकरणाबाबत आता एक मोठी बातमी समोर आली आहे. संगमनेरमध्ये काल झालेल्या गदारोळ आणि त्यानंतर झालेल्या  जाळपोळ आणि तोडफोड प्रकरणी केंद्राने दखल घेत या संपूर्ण प्रकरणाची केंद्रीय गृहमंत्रालयाकडून माहिती घेतली आहे. दरम्यान या प्रकरणाची आता उच्चस्तरीय चौकशी होणार असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील या प्रकरणाची दखल घेत दूरध्वनी वरून प्रकरणाची माहिती घेतल्याची माहिती पुढे आली आहे. अशातच वसंतराव देशमुख (Vasantrao Deshmukh) यांनी बोलताना मर्यादा राखावी, महायुती अडचणीत येईल असे भाष्य करू नये. असेही अजित पवारांनी सूचना केल्याची माहिती पुढे आली आहे.


आश्वासनानंतर काँग्रेसचे ठिय्या आंदोलन अखेर मागे  


संगमनेर येथे भाजप नेते सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांच्या सभेत वसंतराव देशमुख (Vasantrao Deshmukh) यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या कन्या जयश्री थोरात (Jayshree Thorat) यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यानंतर संगमनेरमध्ये (Sangamner) मोठा गदारोळ झाल्याचे दिसून आले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक होत गाड्यांची जाळपोळ केली. तर संगमनेर पोलीस स्टेशनबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी तब्बल 12 तास ठिय्या मांडला. आता पोलिसांनी दिलेल्या आश्वासनानंतर संगमनेरचे ठिय्या आंदोलन अखेर मागे घेण्यात आले आहे.


पोलिसांना 24 तासाची मुदत देत आहोत. 24 तासात संशयित आरोपीला अटक झाली पाहिजे अन्यथा पुन्हा ठिया आंदोलन करणार, असा इशारा जयश्री थोरात यांनी दिला आहे. तर वसंतराव देशमुख यांच्या विरोधात महिला आयोगाकडे तक्रार करणार आहे. पोलिसांच्या कारवाईवर आम्ही समाधानी नाही. माझ्यासारख्या महिलेला 8 तास गुन्हा दाखल करण्यासाठी बसवले, तर इतरांचे काय? पोलिसांना काम करण्यासाठी अवधी देत आहे. आम्ही समाधानी नाही, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान या प्रकरणाचे पडसाद आता राज्याच्या राजकारणातून उमटताना दिसून येत आहे. 


अजित पवारांकडून सुजय विखेंची कानउघडणी


दरम्यान, सुजय विखे यांच्या कार्यकर्त्यांकडून वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुजय विखे यांना फोन केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. अजित पवार यांनी सुजय विखे यांची या वक्तव्या प्रकरणी कानउघडणी केल्याचे समजते. महायुतीला अडचणी निर्माण होतील असं कुठंलही वक्तव्य न करण्याची सूचना देखील अजित पवार यांनी सुजय विखेंना केली आहे.


महिला भगिनींच्या संदर्भात असणारा महायुतीचा खरा चेहरा जनतेसमोर- जयंत पाटील 


 संगमनेर येथील भारतीय जनता पक्षाच्या सभेत काल काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याबद्दल जी विधाने करण्यात आली, त्याचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो. महायुतीचा महिला भगिनींच्या संदर्भात असणारा खरा चेहरा जनतेसमोर उघड झाला आहे. एकीकडे ‘लाडकी बहीण’ योजनेचा गवगवा करायचा तर दुसरीकडे ‘मुलींना घराबाहेर पडणे मुश्किल करू’ अशी भाषा करायची. महायुतीचा आमच्या भगिनींच्या बाबत असणारा तुच्छतावाद उघड होत आहे. राज्यातील महिला भगिनी या विधानाला मतपेटीतून उत्तर देतील. अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केली आहे.


हे ही वाचा