Maharashtra Assembly Elections 2024 नागपूर : राज्याच्या राजकारणात काका पुतण्यांचा संघर्ष आपण नेहमीच अनुभवला आहे. मात्र, नागपुरात वेगळ्या पद्धतीने मामा आणि भाच्याचा राजकीय वैचारिक द्वंद्व समोर आला आहे. भाचा ज्या उमेदवारा विरोधात निवडणूक लढवतो आहे, त्याच विरोधी उमेदवाराच्या उमेदवारी अर्जाचा अनुमोदक मामा बनले आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करताना निवडणूक निर्णय अधिकारी समोर फडणवीस यांच्यासोबत नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे, नीलिमा बावणे या नावाजलेल्या भाजप नेत्यांसह आणखी एक चेहरा होता, जो बहुतांशी लोकांना अनोळखी होता. देवेंद्र फडणवीस यांच्या उमेदवारीचे अनुमोदक म्हणून नागपूरचे नाना सातपुते ही तिथे होते. तर नाना सातपुते गेले अनेक दशकांपासून भाजपचे सामान्य कार्यकर्ते असले, तरी ते यंदाच्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक लढवणारे काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल गुडधे यांचे सख्खे मामा आहेत. त्यामुळे त्यांच्या या उपस्थितीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
राजकीय बांधिलकी एका बाजूला, कौटुंबिक नातेसंबंध दुसऱ्या बाजूला
मी सुरुवातीपासून राजकीय दृष्टिकोनातून भाजपशी जोडलेला आहे. तसेच माझ्या राजकीय भूमिकेशी अखेरपर्यंत मी बांधील राहणार आहे. त्यामुळे माझी राजकीय बांधिलकी एका बाजूला, तर माझे कौटुंबिक नातेसंबंध दुसऱ्या बाजूला असा सुस्पष्ट अंतर मी ठेवला असल्याची प्रतिक्रिया नाना सातपुते यांनी यावेळी दिली आहे.
राजकीय ट्रेंडमध्ये #DevaBhau देशात पहिल्या क्रमांकावर
नागपूरच्या दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवार असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन करत संविधान चौकातून ते आपला नामांकन अर्ज भरण्यासाठी रॅली काढणार आहेत. त्यानंतर ते तहसील कार्यालयात जात आपला अर्ज सादर करणार आहेत. याबबात बोलताना हा विजयाचा शंखनाद असेल अशी प्रतिक्रिया देत देवेंद्र फडणवीसांनी आपल्या विजयाचा विश्वास बोलून दाखवला आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उमेदवारी अर्ज दाखल करत असताना एक्सवर देखील त्याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. एक्सच्या ट्रेंडवर #DevaBhau चा जोरदार ट्रेंड असल्याचे समोर आले आहे. राजकीय ट्रेंडमध्ये #DevaBhau देशात पहिल्या क्रमांकावर आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्ज दाखल करताना सोशल मीडियावर देवाभाऊ ट्रेंड चा जोरदार बोलबाला असल्याचे पुढे आले आहे.
हे ही वाचा