उल्हासनगर : उल्हासनगरातील टीम ओमी कलानीच्या भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या 22 नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश करत भाजपला धक्का दिला होता. यानंतर हा प्रवेश खोटा असल्याचा आरोप भाजपनं केला आहे. प्रवेश खरच झाले असतील तर राष्ट्रवादीनं अधिकृत लेटरहेडवर या नगरसेवकांची यादी जाहीर करावी, अन्यथा महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी भाजपचे प्रदीप रामचंदानी यांनी केली आहे.
उल्हासनगर महापालिकेच्या मागील निवडणुकीत टीम ओमी कलानीचे 22 नगरसेवक भाजपच्या चिन्हावर निवडून आले होते. पप्पू कलानी जेलबाहेर आल्यानंतर कलानी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेत टीम ओमी कलानी राष्ट्रवादीत विलीन केली. तसंच टीम ओमी कलानीच्या भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या 22 नगरसेवकांनी ठाण्यात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करत मोठी खळबळ उडवून दिली. यानंतर हे प्रवेश प्रत्यक्ष नगरसेवकांचे झालेले नसून नगरसेवकांच्या पती किंवा पत्नी यांचे असल्यानं प्रवेश खोटे असल्याचा आरोप भाजपचे प्रवक्ते प्रदीप रामचंदानी यांनी केला आहे. तसंच खरोखर जर राष्ट्रवादीत 22 नगरसेवकांनी प्रवेश केला असेल, तर राष्ट्रवादीनं अधिकृत लेटरहेडवर या नगरसेवकांची यादी जाहीर करावी, अन्यथा महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी प्रदीप रामचंदानी यांनी केली आहे.
या सगळ्याबाबत टीम ओमी कलानीचे प्रमुख आणि पप्पू कलानी यांचे सुपुत्र ओमी कलानी यांना विचारलं असता, पक्षांतर बंदी कायद्यामुळे प्रत्यक्ष नगरसेवकांनी प्रवेश केलेला नसला, तरी नगरसेवकांचे पती किंवा पत्नी यांनी प्रवेश केला असून त्यामुळे नगरसेवकही आपसूकच राष्ट्रवादीत आले असल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. तसंच प्रदीप रामचंदानी हे स्वतः महापालिकेचे स्वीकृत नगरसेवक आहेत, मात्र पुढच्या निवडणुकीत ते स्वीकृत नगरसेवक होतील, इतकंही संख्याबळ भाजपचं नसेल, आम्ही कलानी आहोत, कुणाला घाबरत नाही, असा थेट इशारा ओमी कलानी यांनी दिला आहे.
उल्हासनगर शहरात जिथे कलानी, त्यांचीच सत्ता हे समीकरण गेल्या अनेक वर्षांपासून कायम आहे. गेल्या निवडणुकीतही कलानी समर्थक नगरसेवक भाजपच्या तिकिटावर निवडून आल्यानं महापालिकेवर भाजपची सत्ता आली होती. मात्र, विधानसभेत कलानी परिवाराला भाजपचं तिकीट न मिळाल्यानं त्यांनी शिवसेनेला पाठींबा देत भाजपची सत्ता अक्षरशः खेचून घेतली होती. त्यामुळे पुढच्या निवडणुकीतही याच सूत्रानुसार राष्ट्रवादीची सत्ता महापालिकेवर येईल, असा विश्वास कलानी गटाकडून व्यक्त केला जातोय.