मुंबई : दक्षिण भारतातील कार्तिकेय स्वामीच्या एका मंदिरावरुन हिंदू मुस्लिम (Hindu) वादाचं राजकारण सुरू झालं असून दिल्लीतील संसद आणि महाराष्ट्रातील विधिमंडळ सभागृहातही या वादाचे पडसाद उमटले. या वादात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी थेट उद्धव टाकरेंचं नाव घेऊन त्यांना टोला लगावला. त्यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाहांच्या भाषणातील तो व्हिडिओ शेअर करत उद्धव ठाकरेंना डिवचलं. मग, फडणवीसांनी डिवचल्यानंतर शांत बसतील ते ठाकरे कसले? उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) नागपूरच्या विधिमंडळातून अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर ठाकरे शैलीत पलटवार केला.

Continues below advertisement

दक्षिण भारताच्या तामिळनाडूतील मुदराईजवळ असलेल्या कार्तिकेय स्वामीच्या एका मंदिरावरुन सुरु झालेल्या वादाची आग देशाची राजधानी दिल्लीत पोहोचलं. त्यावरुन संसदेत झालेल्या एका भाषणाचा वाद महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरात पोहोचला, जो वाद आहे एकेकाळच्या मित्रपक्षांमधला. अमित शाह आणि उद्धव ठाकरेंमधल्या ह्या वादावर आज चांगलंच टीका-मंथन झाल्याचं पाहायला मिळालं. 

त्याचं झालं असं की, या मंदिराच्या वादात उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेवर गृहमंत्री अमित शाहांनी संसदेतील भाषणात कठोर टीका केली.अमित शाहांच्या त्या भाषणाची धग तात्काळ महाराष्ट्रात पोहोचली, कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्याची लिंक आपल्या एक्स अकाऊंटवर पोस्ट केली. ते भाषण शेअर करताना फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना उद्देशून कॅप्शन दिलं, कोण होतास तू, काय झालास तू. त्यामुळे, अमित शाह आणि फडणवीसांचे ते शब्द ठाकरेंच्या जिव्हारी लागले. विधान परिषदेचे आमदार या नात्यानं उद्धव ठाकरे नागपुरात पोहचता क्षणी अमित शाहांवर अक्षरश: तुटून पडले. अमित शाहांनी मला हिंदुत्व शिकवू नये, अशा भाषेत त्यांनी उत्तर दिलं. एवढंच नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर, आणि अमित शाहांच्या लेकावरही उद्धव ठाकरेंनी टीका केली.

Continues below advertisement

नेमका वाद काय?

तामिळनाडूच्या मुदराईजवळ अरुलमिगू सुब्रमण्य स्वामीचं पंड्याकालीन मंदिर आहे, सहाव्या शतकात म्हणजे इस्लामचा जन्म होण्याआधी या मंदिराची स्थापना झाली आहे. त्याच्या समोरचं तिरुपरनकुंद्रम टेकडीवर कार्तिक दिप प्रज्वलनाची हजारो वर्षांची परंपरा आहे. मात्र, तिथं जुना दर्गा असल्याने या प्रथेला हिंदू-मुस्लिम वादाचं स्वरुप आलंय. दर्ग्याच्या ट्रस्टकडून दीपस्तंभाच्या जागेवर अतिक्रमण होत असल्याचा आरोप केला जातोय. त्यामुळे, अखेर दीप प्रज्वलनाचा वाद कोर्टात पोहोचला. याप्रकरणी, मद्रास हायकोर्टाचे जस्टीस जी.आर. स्वामीनाथन यांनी मंदिर समितीला दीप प्रज्वलनास परवानगी दिली. द्रमुकच्या स्टॅलिन सरकारला संबंधित जागेवर आवश्यक ती सुविधा, सुरक्षा देण्याचेही आदेश दिले. मात्र, तणावाचं कारण देत स्टॅलिन सरकारने उच्च न्यायालयाचे आदेश धुडकावले आणि त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. स्टॅलिन सरकारने केंद्र सरकार आणि भाजपवर आरोपही केले. तर, 4 डिसेंबरला टेकडीवरील दीपस्तंभाकडे जाणाऱ्या भाविकांना स्थानिक पोलिसांनी मज्जाव केला. त्यानंतर, द्रमुकच्या खासदारांनी जस्टीस स्वामीनाथन यांच्याविरोधात महाभियोगाची नोटीस दिली. लोकसभा अध्यक्षांकडे सादर केलेल्या या महाभियोग प्रस्तावावर (नोटीसवर) 120 खासदारांच्या सह्या आहेत, त्यात उद्धव ठाकरेंचे खासदार अरविंद सावंत यांची सुद्धा सही आहे. त्यामुळे, उद्धव ठाकरे तुम्ही सुद्धा मंदिराच्या प्रथेला विरोध करुन दर्ग्यासाठी समर्थन करता, असा आरोप करत अमित शाहांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं.

शिंदेंच्या शिवसेनेकडूनही ठाकरे लक्ष्य

मंदिराच्या प्रथेला विरोध करणाऱ्या द्रमुकला पाठींबा दिल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं सुद्धा उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. तर, हिंदुत्वावरुन उद्धव ठाकरेंनी अमित शाहांवर बोचरी टीका केल्याने भाजपच्या नेत्यांचंही पित्त खवळलं आणि त्यांनीही ठाकरेंवर प्रहार केले. तामिळनाडू मधील विधानसभा निवडणुका अवघ्या सहा महिन्यांवर आल्या आहेत. त्यामुळे भाजप हिंदू-मुस्लिम वाद भडकवत असल्याचा आरोप द्रमुक नेते करत आहेत. तर स्टॅलिन सरकार हिंदू विरोधी असल्याची टीका भाजप नेते करत आहेत. या वादातील उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अमित शाहांनी दक्षिणेकडील हा वाद मुंबईपर्यंत आणून ठेवला आहे. त्यावरुन, महाराष्ट्रातील ठाकरे विरुद्ध भाजप-शिवसेना असा सामना रंगला आहे. 

हेही वाचा

 गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार