मुंबई: काही दिवसांपूर्वी पनवेल दौऱ्यात उद्धव ठाकरे यांच्याकडून दुर्लक्ष झाल्यामुळे दुखावल्या गेलेल्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेना पक्षात प्रवेश केला. या नाराज कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरे यांच्या हस्ते एका रुग्णवाहिकेचे लोकार्पण करुन घ्यायचे होते. परंतु, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना या कार्यक्रमासाठी वेळ देता आला नाही. ही गोष्ट या कार्यकर्त्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली. याच नाराजीतून या कार्यकर्त्यांनी शिंदे गटाला जवळ करण्याचा निर्णय घेतला. या घटनेची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) तोंडावर अनेकजण ठाकरे गटातून बाहेर पडत आहेत. यामध्ये आता स्थानिक स्तरावरील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भर पडली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशाप्रकारचे वातावरण ठाकरे गटासाठी डोकेदुखी ठरु शकते. 


नेमकं काय घडलं?


उद्धव ठाकरे यांच्या पनवेल दौऱ्यावेळी स्थानिक कार्यकर्त्यांना त्यांच्या हस्ते एका रुग्णवाहिकेचे उद्घाटन करुन घ्यायचे होते. ठाकरे गटाचे पनवेल महानगरप्रमुख प्रथमेश सोमण यांनी 16 लाख खर्च करुन रुग्णसेवेसाठी अ‍ॅम्ब्युलन्स विकत घेतली. उद्धव ठाकरे पनवेलमध्ये आल्यावर त्यांच्या हस्ते या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करावे, असा त्यांचा बेत होता. मात्र, उद्धव ठाकरे यांनी काही कारणास्तव या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. त्यामुळे प्रथमेश सोमण आणि त्यांचे कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले. अखेर या सगळ्यांना शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गुरुवारी रात्री प्रथमेश सोमण आणि त्यांचे कार्यकर्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी गेले. याठिकाणी झालेल्या छोटेखानी सोहळ्यात या सगळ्यांना अ‍ॅम्ब्युलन्स चालकासकट शिंदे गटात प्रवेश केला. 


उद्धव ठाकरे यांचा दक्षिण मुंबई लोकसभा दौरा


गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे राज्यभरात दौरे करत आहेत. शुक्रवारी उद्धव ठाकरे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. ते कफ परेड आणि गिरगाव भागात शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. गुरुवारी सकाळी त्यांची दापोलीत सभा झाली. त्यावेळी त्यांनी अमित शाह आणि भाजपवर टीकास्त्र सोडले होते. अमित शाह आता आमच्यावर घराणेशाहीचा आरोप करतात. पण 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत आमची गरज असल्याने त्यांनी मातोश्रीवर येऊन लोटांगण घातले होते. तेव्हा अमित शाह यांना आमची घराणेशाही दिसली नव्हती का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.


आणखी वाचा


निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का; वाशिम-यवतमाळ ठाकरे गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश