मुंबई: मी भाजपला लाथ घातली कारण त्यांचं हिंदुत्त्व हे गोमुत्रधारी आणि बुरसटलेलं होते. मी बाळासाहेबांचा विचार कुठेही सोडलेला नाही, असे वक्तव्य उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केले. ते शनिवारी शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावरुन बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिवंगत उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांनी दिलेल्या एका सल्ल्याविषयीचा किस्सा सांगितला.


काही वर्षांपूर्वी रतन टाटा आम्हाला भेटायला मातोश्रीवर आले होते. त्यावेळी रतन टाटा मला म्हणाले की, तुला आणि मला खूप मोठी परंपरा आणि वारसा लाभला आहे. मी जेआरडी यांच्यानंतर टाटा समूहाचा कारभार हाती घेतला तेव्हा विचार करायचो, आता जेआरडी असते तर काय निर्णय घेतला असता? त्यामुळे मला कुठला निर्णयच घेता येत नव्हता. पण नंतर माझ्या लक्षात आलं की, अनेक वर्षे जेआरडींनी मला काम करताना बघितलं आहे, तेव्हाच त्यांनी माझ्याकडे टाटा समूहाची धुरा दिली. तुझंही तसंच आहे. जशी माझी निवड जेआरडींनी केली, तशी तुझी निवड शिवसेनाप्रमुखांनी केली आहे. तू कठीण काळात काय करशील, हे त्यांनी बघितलं आहे आणि तुझ्याकडे पक्षाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे तुला जे योग्य वाटेल ते कर, असे रतन टाटा यांनी मला सांगितले. त्यामुळेच मी मला योग्य वाटतात, तेच निर्णय घेतो, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. 


शिवसैनिक माझं शस्त्र, तुमच्या पाठबळामुळे मी उभा राहू शकलो: उद्धव ठाकरे


आज विजयादशमीच्या मुहूर्तावर प्रत्येकजण वेगवेगळ्या शस्त्रांची पूजा करत आहे. काही जणांकडे तलवार, गन, मशिनगन अशी शस्त्र आहेत. पण आपल्याकडे लढवय्या मन हे शस्त्रं आहे. गेल्या अनेक वर्षांच्या परंपरेप्रमाणे ठाकरे कुटुंबाने शस्त्रास्त्रांची पूजा केली. आता मी शिवतीर्थावर शिवसैनिकांची पूजा करत आहे, कारण तुम्हीही माझं शस्त्र आहात. तुमच्या पाठबळाशिवाय मी उभा राहू शकलो नसतो. सगळं ओरबाडून घेतल्यानंतरही तुम्ही होतात, म्हणून मी उभा राहू शकलो. आता दिल्लीवरुन कितीही पिढ्या आल्या तरी मी त्यांना गाडून त्यांच्या छाताडावर भगवा झेंडा गाडेन, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.



आणखी वाचा


आमचे सरकार आल्यास आम्ही राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी  महाराजांचे  मंदिर बांधणार : उद्धव ठाकरे


दोन महिन्यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री या व्यासपीठावर; संजय राऊतांचा CM पदावर दावा, मेळाव्यातून शिंदेंवर जोरदार हल्ला