Sanjay Raut Dasara Melava : मुंबई : देशभरात विजयदशमी दसरा साजरा होत असताना राज्यातील विधानसभा निवडणुकांपूर्वी यंदाचा दसरा राजकीय नेत्यांच्या सभांनी गाजणार आहे. मुंबईतील शिवाजी पार्कवर दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या माध्यमातून विचारांचं सोनं लुटण्याची प्रथा सुरू केली. त्यामुळे, मुंबईतील शिवसेनेच्या या दसरा मेळाव्याकडे राज्याचे लक्ष लागलेले असते. मात्र, यंदा राज्यात 4 दसरा मेळाव्यांकडे महाराष्ट्रातील जनेतेचं लक्ष लागून होतं. बीड जिल्ह्यातील नारायणगडावर मराठा उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा पार पडला. तर, सावरगडावर भाजप नेत्या पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा संपन्न झाला. आता,मुंबईतील शिवाजी पार्क आणि आझाद मैदानावर दोन्ही शिवसेनेचा दसरा मेळावा होत असून शिवाजी पार्क मैदानावर शिवसेना ठाकरे गटाचा मेळावा होत आहे. येथील मेळाव्यात भाषण करताना शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महायुती सरकार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (Eknath Shinde) जोरदार हल्लाबोल केला. तसेच, पुढील 2 महिन्यात या व्यासपीठावर आपण विजयी सभा घेणार असून उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री असतील, असेही राऊत यांनी म्हटले.
शिवसेना ठाकरे गटाचा मेळावा शिवाजी पार्कवर होत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील दसरा मेळावा मुंबईतील आझाद मैदानावर पार पडत आहे. या दोन्ही मेळाव्यातून दोन्ही नेते एकमेकांवर टीकेची झोड उठवणार हे निश्चित. मात्र, तत्पूर्वी शिवसेना ठाकरे व शिंदे गटातील नेत्यांनीच एकमेकांवर हल्लाबोल केला. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीसांसह भाजपला लक्ष्य केले. आता, संजय राऊत यांनीही भाजप आणि एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला. आदित्य ठाकरेंनी आपल्या भाषणात, आम्ही कधी वडिलांसमोर भाषण केलं नाही, बाळासाहेबांपासून ते आजपर्यंत. पण, यंदा मी वडिलांसमोर भाषण करतोय, असे आदित्य ठाकरेंनी म्हटलं होतं. आदित्य ठाकरेंच्या या विधानावरुन संजय राऊतांनी भाषणाची सुरुवात केलीय. आदित्य तुम्ही आता लहान बाळ राहिलेले नाहीत, तुम्ही महाराष्ट्राचे, देशाचे नेते झालेले आहात, असे म्हणत आदित्य ठाकरेंना संजय राऊतांनी वडिलकीच्या नात्याने सूचना केली.
टाटांसोबतच विश्वासाचं दुसरं नाव ठाकरे
उद्योगपती गेल्यावर लोकांना सहसा वाईट नाही, पण रतन टाटांच्या निधनानंतर देश हळहळला. कारण, टाटा म्हणजे विश्वास, टाटा म्हणजे ट्रस्ट आहे. या देशात टाटांसोबतच विश्वासाचं दुसरं नाव ठाकरे असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं. तसेच, शिवसेना एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यावर जोरदार टीका केली. गद्दारांचा मेळावा आझाद मैदानात होत आहे, पण खरंतर त्यांनी गुजरातमध्ये सूरतला मेळावा घेतला पाहिजे, कारण त्यांचा जन्म गुजरातला झालाय. खरं म्हणजे, नाव आझाद मैदान आणि व्यासपाठीवर सगळे मोदींचे गुलाब आहेत.
2 महिन्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री
आपला हा दसरा मेळावा नसून लोकसभेतील विजयाचा विजयी मेळावा आहे, पुढील 2 महिन्यांनी आणखी एक विजयी मेळावा इथं घ्यायचा आहे. 2 महिन्यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री या व्यासपीठावर असेल, उद्धवसाहेब तुम्हाला या राज्याचं नेतृत्व करावं लागेल, असे म्हणत संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे हेच महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असल्याचे म्हटले.