चंद्रपूर : निवडणूक आयोगाकडून घोषणा होण्यापूर्वीच आगामी विधानसभा निवडणुकांचं रणशिंग राजकीय पक्षांकडून फुंकण्यात आलंय. राज्यात महाविकास आघाडी व महायुतीमध्ये थेट सामना होणार असल्याचे स्पष्ट झाले असून या आघाड्यांमधील सर्वच राजकीय पक्ष कामाला लागेल आहेत. तसेच, विविध जिल्ह्यात दौरे, मेळावे आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून ते जनतेमध्ये जात आहेत. महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे विविध जिल्ह्यात जाऊन चाचपणी करत आहेत. तसेच, उमेदवारांची यादीही निश्चित करताना दिसून येतात. दुसरीकडे शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हेही दौरे करत महायुती सरकार आणि केंद्रातील मोदी सरकावर हल्लाबोल करत आहेत. रविवारी नागपूर येथील कार्यक्रमातून उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही बोचरी टीका केली होती. आता, या टिकेला भाजपाकडून प्रत्युत्तर देण्यात आलंय. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar bawankule) यांनी उद्धव ठाकरेंना निवडणुकीचं चॅलेंजच दिलं आहे. 


देवेंद्र फडणवीस यांची जमानत जप्त करण्याची भाषा बोलणारे उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील कुठल्याही  विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवावी, आमदार होऊन नंतर आरोप करावे असे आव्हान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. ठाकरेंचा विदर्भ दौरा वैफल्यातून झाला आहे, असेही ते म्हणाले. चंद्रपुरात पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी निवडणूक जिंकली नाही, आमदार म्हणून निवडून आले नाही. मुख्यमंत्री म्हणूनही त्यांनी मागच्या दरवाज्याने आमदारकी मिळवली. याउलट देवेंद्र फडणवीस लोकनेते आहेत, ते पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. उद्धव ठाकरे यांचे नेतृत्त्व कुणी स्वीकारायला तयार नाही. म्हणूनच त्यांचे आमदार बाहेर पडले. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राचे वाघ होते. हिंदू विचार महाराष्ट्राच्या प्रत्येकाच्या मनात जागवणारे बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र उध्दव ठाकरे ही एकमेव ओळख त्यांची आहे. मात्र, त्यांनी हिंदुत्वाचा विचार संपविला आहे. त्यामुळेच त्यांना काँग्रेससोबत जावे लागले आहे. 


शंभर कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपात तुरुंगवास भोगावा लागलेल्या अनिल देशमुख व दीडशे कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपात आमदारकी गमावलेल्या सुनील केदार यांची सोबत त्यांना करावी लागत आहे. म्हणजेच, आगामी विधानसभा निवडणुकीत महाआघाडीने हार पत्करली आहे, अशा शब्दात बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर प्रतिहल्ला केला. 


राहुल गांधीचा खोटेपणा घरोघरी सांगणार


राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत संविधान बदलणार असे सांगितले. अमेरिकेत गेल्यावर आरक्षणाची गरज नाही असे सांगितले, त्यांचा हा खोटेपणा महाराष्ट्रातील प्रत्येक घरी जाऊन सांगणार आहोत. विरोधकांनी जनतेचा विश्वास गमावला असल्याचेही ते म्हणाले. लाडकी बहीण योजना बंद करण्याची भाषा करणाऱ्यांना महाराष्ट्रातील भगिनी सोडणार नाहीत, असेही बावनकुळे यांनी म्हटले. 


ठाकरेंसमोर छत्रपतींचा एकेरी उल्लेख


सुनील केदार यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला. ते बोलत असताना ठाकरे केवळ बघत राहिले, असेही बावनकुळे म्हणाले