मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी 23 मार्च रोजी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेसोबच्या (ठाकरे गट) युतीवर मोठी माहिती दिली. आमची शिवसेनेसोबतची (Shivsena) युती आता संपुष्टात आलेली आहे, असे त्यांनी सांगितले. यावरच आता ठाकरेंच्या शिवसेनेतील नेते तथा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. युती संपुष्टात आल्याचा प्रकाश आंबेडकरांचा निर्णय हा एकतर्फी आहे, असे राऊत म्हणालेत. ते आज (23 मार्च) सकाळी माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
त्यावेळी लोकसभेचा विचार करण्यात आला नव्हता
प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडीबरोबर शिवसेनेची (ठाकरे गट) युती झाली. त्याला दीड वर्षे होऊन गेले. ही युती अत्यंत चांगल्या हेतूने झाली होती. ही युती करताना विधानसभा आणि महानगरपालिका निवडणुकीसाठी एकत्र काम करता येईल असे ठरले होते. लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election) त्यावेळी विचार करण्यात आला नव्हता, असे राऊतांनी सांगितले.
युतीनंतर महाराष्ट्रात चैतन्याची लाट उसळली होती
तेव्हा उद्धव ठाकरे यांनी आंबेडकर भवनात जाऊन प्रकाश आंबेडकर सोबत असताना या युतीची घोषणा करण्यात आली होती. या युतीमुळे महाराष्ट्रात चैतन्याची लाट उसळली होती. ठाकरे आणि आंबेडकर यांचं नातं खूप जुनं आहे. ही युती करताना राजकारण कमी आणि समाजकारण जास्त करावं, अशी भूमिका होती. या दोन्ही नेत्यांत उत्तम चर्चा, उत्तम संवाद झाला होता, असे राऊत यांनी यावेळी सांगितले.
आमचा चार जागांचा प्रस्ताव अजूनही कायम
प्रकाश आंबेडकर यांनी ही युती तुटल्याची एकतर्फी घोषणा केली. हे दुर्दैव आहे. अगोदर दोन नेत्यांत चर्चा होणं गरजेचं होतं. युती करताना चर्चा झाली होती, तर मग दूर होतानाही चर्चा होणं गरजेचं होतं. ते राजकीय संस्कृतीला धरून झालं असतं. मात्र हे दुर्दैवाने झालं नाही. प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीचे घटक आहेत. आम्ही लोकसभा निवडणुकीसंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली. आम्ही त्यांना चार जागांचा प्रस्ताव दिला आहे. हा प्रस्ताव अजूनही कायम आहे, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.
आंबेडकर निर्णयाचा फेरविचार करतील
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारासदाराने अत्यंत महात्त्वाचा निर्णय घेणं गरजेचं आहे. जागावाटपात एक-दोन गोष्टी मागेपुढे होऊ शकतात. मात्र आंबेडकरांसोबतची युती हा राजकीय नव्हे तर भावनिक विषय आहे. आम्हाला खात्री आहे की, प्रकाश आंबेडकर त्यांच्या निर्णयाचा फेरविचार करतील. कारण राज्यातील तमाम जनतेच्या भावना या प्रकाश आंबेडकर यांच्या निर्णयाशी जोडलेल्या गेलेल्या आहेत, अशा भावना राऊतांनी व्यक्त केल्या.