मुंबई : राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस असून पहिल्या दिवसापासूनच राज्यातील महिलांवरील अत्याचार आणि सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच, अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यात आल्यानंतर आज तिसऱ्या दिवशी ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. मंत्री गोरे यांनी एका महिलेला स्वत:चे नग्न फोटो पाठवल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला होता. त्यानंतर, विधिमंडळात आणि राजकीय वर्तुळात जोरदा गोंधळ सुरू झाला आहे. राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांवरुन विरोधक आणि विरोधी पक्षातील महिला नेत्या आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, सत्ताधारी पक्षातील महिला नेत्या व महिला आयोगाच्या अध्यक्षा कातडी बवाच भूमिका घेत असल्याचा आरोप शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्याकडून केला जात आहे.
जयकुमार गोरे यांच्यावर होत असलेल्या आरोपानंतर आता सुषमा अंधारे यांनी ट्विट करुन महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि भाजपा आमदार महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला आहे. अंधारे यांनी थेट नाव न घेता संदर्भ देत महायुतीमधील या दोन्ही महिला नेत्यांना लक्ष्य केलंय. ''विषय भाजपच्या किरीटचा असो किंवा जयकुमार गोरेंचा. शिफारशीने मिळालेला आयोग कार्पोरेट पार्ट्यापुरता आहे, अशा शब्दात नाव न घेता सुषमा अंधारे यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच, एरवी चित्रविचित्र आवाज काढत आक्रस्ताळेपणा करणाऱ्या छोट्या भुरट्याताई सुद्धा गोरेबद्दल चकार शब्द काढत नाही, असे म्हणत चित्रा वाघ यांनाही लक्ष्य केलंय. हे सगळे नग म्हणजे "एका माळेचे मणी अन् ओवायला नाही कुणी" असा प्रकार आहे,'' अशा शब्दात भाजप महायुतीमधील महिला नेत्यांवर सुषमा अंधारे यांनी जोरदार प्रहार केला आहे.
जयकुमार गोरेंचं प्रकरण नेमकं काय?
राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले आहेत. या महिलेने राज्यपाल आणि विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांना पत्र पाठवून मदतीची याचना केली आहे. जयकुमार गोरे यांनी आपल्याला त्यांचे नग्न अवस्थेतील फोटो पाठवले होते. हे प्रकरण 2019 साली निकालात निघाले होते. मात्र, आता मंत्री झाल्यानंतर जयकुमार गोरे पुन्हा या महिलेच्या पाठी लागल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. जयकुमार गोरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे नेते आहेत. त्यांच्यावर अशाप्रकारचे गंभीर आरोप झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर जयकुमार गोरे यांनी मुंबईत विधिमंडळाच्या आवारात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आपली बाजू स्पष्ट केली. माझ्यावर 2017 साली एक गुन्हा दाखल झाला होता. दोन वर्षे हा खटला सुरु होता, 2019 मध्ये या प्रकरणाचा निकाल लागला होता. त्या निकालाची प्रत माझ्याकडे आहे. मला या प्रकरणात न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे, असेही गोरे यांनी सांगितले.