मुंबई : पहलगाममध्ये धर्म विचारून हिंदूंना गोळ्या मारल्या अन् इथे निष्पाप हिंदूंना भाषा विचारून चोपत आहेत, असे म्हणत भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार (Ashish shelar) यांनी मनसेच्या मराठी भाषा आंदोलनावरुन हल्लाबोल केला होता. मराठीसाठी एकत्र येत ठाकरे बंधूंनी मेळावा घेतल्यानंतर भाजपकडून या मेळाव्यावर टीका होत आहे. विशेषत: उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) लक्ष्य केलं जात आहे. त्यातच, भाजप खासदार निशिकांत दुबनेही वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्रात एकही उद्योग नाही, सगळं आमच्याकडे, आमच्या पैशांवर जगता अन् दादागिरी करता, असे अकलेचे तारे भाजप खासदाराने तोडले आहेत. आता, आशिष शेलार आणि निशिकांत दुबे (Nishikant dubey) यांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंनी पलटवार केला आहे. 

राज्यातील सर्व माध्यमांचे आभार मानतो, मराठीसाठी घेतलेल्या सभेला माध्यमांकडूनही सहकार्य झाले. मुंबईत मराठी माणसासोबत इतर भाषिक गुण्या-गोविंदाने राहत आहेत. भाजपच्या बुडाला यामुळे आग लागली आहे, दुबेसारखे लकडबग्गे आहेत, जो आग लगाने की कोशिष कर रहै है.. असे म्हणत भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या वक्तव्यावर शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पहिली प्रतिक्रिया दिली. 

आमचा भाषेला विरोध नाही आमचा विरोध हिंदी सक्तीला आहे. आम्ही शिवसेना, शिवसैनिक जातपात धर्म न बघता मदत करत आहोत. मराठी माणसांची तुलना जे पहलगामच्या अतिरेक्यांशी करत आहेत, तेच खरे मराठीचे मारेकरी आहेत. हे हिंदूंनाही वाचवू शकत नाही, मराठीवर अन्याय करणाऱ्यांची बाजू घेत आहेत. मूळ भाजपा ज्यांची शिवसेनेसोबत युती होती ती ह्यांनीच मारुन टाकली.  आताच्या भाजपने उर बडवे घेतले आहेत, या पक्षातून त्या पक्षातून लोकं घेत आहेक. आम्ही एकत्र आल्याने महाजन याच्यासारख्या लोकांच्या बुडाला आग लागली आहे, असे म्हणत भाजप नेत्यांकडून आलेल्या प्रतिक्रियेवर उद्धव ठाकरेंनी पलटवार केला. 

निशिकांत दुबेंचं ठाकरे बंधूंना चॅलेंज

मराठीच्या मुद्द्यावरुन एकत्र आलेल्या राज आणि उद्धव ठाकरे यांची आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राजकीय युतीच्या दिशेने पावले पडण्याची शक्यता लक्षात घेऊन भाजपने ठाकरे बंधूंवर जोरदार हल्लाबोल करण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रासह उत्तर भारतातील हिंदी भाषिके नेतेही ठाकरे बंधूंवर तुटून पडले आहेत. भाजपचे उत्तर भारतातील खासदार निशिकांत दुबे यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.  उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे सध्या जे काही करत आहेत, त्यापेक्षा खालच्या दर्जाचं काहाही नसू शकते. आम्ही याचा प्रतिकार करणार. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी माहीमच्या दर्ग्यासमोर जाऊन हिंदी किंवा उर्दू भाषिकाला मारुन दाखवावं. तरच मी मान्य करेन  की, उद्धव आणि राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार आहेत, अशी टीका निशिकांत दुबे यांनी केली.

हेही वाचा

अर्धनग्न अवस्थेत मनसे नेत्याच्या मुलाचा धिंगाणा; रिल्सस्टार राजश्री मोरेच्या कारला धडक, धमकीही दिली