मुंबई :मनसे (MNS) प्रदेश उपाध्यक्ष जावेद शेख यांच्या मुलाने रस्त्यावर दारू पिऊन अर्ध नग्न अवस्थेत धिंगाणा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मॉडेल अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर राजश्री मोरेच्या गाडीला जावेद शेख यांच्या मुलाने धडक देऊन तिच्याशी बाचाबाची करत असल्याचं व्हिडिओतून दिसून येते. मुंबईतील (Mumbai) अंधेरी पश्चिम परिसरात मध्यरात्री ही घटना घडली असून  अर्धनग्न अवस्थेत, दारुच्या नशेत महिलेसोबत धिंगाणा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Viral video) झाला आहे. स्वत: राजश्री मोरेनं हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर आता शिवसेना नेते संजय निरुपम यांनी देखील हा व्हिडिओ शेअर करत मनसेला सवाल केले आहेत. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते जावेद शेख यांचा मुलगा राहिल जावेद यांनी राजश्री मोरेच्या कारला धडक दिल्यानंतर तिच्यासोबत वाद घातला, तसेच गाडीचं नुकसान झालंय, तर माझ्या बापाकडून पैसे घे असे म्हणत शिवीगाळ देखील केली. विशेष म्हणजे यावेळी घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांना देखील राहिलने दारुच्या नशेत दम भरला. माझा बाप मनसेच्या राज्य उपाध्यक्ष असल्याचे सांगत बापाचं नावाने पोलिसांना आणि महिलेला दाखवून देण्याचे धमकी राहिलने दिली. त्यानंतर आंबोली पोलिसांनी धिंगाणा करणाऱ्या मनसे नेत्याच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. 

दरम्यान, सोशल मिडिया एन्फ्लुएन्सर राजश्री मोरेच्या सोबत घडलेला हा प्रकार तिने इंस्टाग्रामवर व्हिडीओद्वारे शेअर करत सार्वजनिक केला आहे. राजश्रीने याप्रकरणी आंबोली पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करुन हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचा दावा केला आहे. काही दिवसांपूर्वी तिने हिंदी मराठीच्या वादात उडी घेत मराठी भाषेबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने तिला टार्गेट केलं जात असल्याचंही तिने म्हटलं.

राजश्रीने मराठीवरुन केलं होतं वादग्रस्त वक्तव्य

मुंबई उपनगरातील वर्सोवात राहणारी मराठी अभिनेत्री राजश्री मोरेनं (Rajshree More) इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट केलेला. त्यामध्ये तिनं मराठी लोकांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलेलं. राखी सावंतची सख्खी मैत्रीण असलेली राजश्री मोरे व्हिडीओमध्ये म्हणालेली की, "मराठी माणसांना मेहनत करायला शिकवा, काम करण्याची मानसिकता मराठी माणसांमध्ये नाही आहे..." तसेच, या व्हिडीओमध्ये बोलताना तिनं परप्रांतीय मुंबई सोडून गेले तर मराठी माणसांची अवस्था बिकट होईल, असं वक्तव्यही केलं होतं. 

संजय निरुपम यांचा मनसेला सवाल

एका मराठी भाषिक महिलेसोबत शिवीगाळ करताना मनसेच्या नेत्याचा मुलगा. वरुन आपल्या बापाच्या नावाचा धाक दाखवतोय, मराठी स्वाभिमानाची रक्षा करण्याचा दावा करणाऱ्यांचा हा खरा चेहरा आहे. या मुस्लिमांच्या दबावात मनसेवाले हिंदूंवर हल्ले करणार का? असा सवाल शिवसेना नेते संजय निरुपम यांनी ट्विटरवरुन विचारला आहे. निरुपम यांनी मनसे नेत्याचा मुलगा आणि राजश्री मोरे यांच्यातील बाचाबाचीचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे. 

हेही वाचा

अवघी पंढरी हळहळली; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, 2 चिमुल्यांसह पत्नीची शेतातील विहिरीत उडी