Uddhav Thackeray on Raj Thackeray : शिक्षकांच्या मुद्द्यावर बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपसोबत (BJP) राज ठाकरेंवर (Raj Thackeray) निशाणा साधला आहे. शिक्षक आमदार कपिल पाटील (Kapil Patil) यांचे विश्वासू शिक्षक भारतीचे सरचिटणीस जालिंदर सरोदे आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहेत. जालिंदर सरोदे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी हाती शिवबंधन बांधलं आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर घणाघात केला, यासोबत राज ठाकरे यांच्यावरही नाव न घेता टीका केली आहे.


जालिंदर सरोदेंचा ठाकरे गटात प्रवेश


उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, जालिंदर सर तुम्ही शिक्षक सेना पुरतेच काम नाही तर, शिवसेनामध्ये सुद्धा काम करणार आहात. तुम्ही शिक्षक आहात राजकारणात सुसंकृतपणा आणण्याची गरज आहे. शिक्षक म्हटल्यानंतर विद्यार्थी ऐकणार नाही असं होत नाही. वेळेप्रसंगी तुम्ही छडी सुद्धा हातात घ्यावी लागेल. आज तुम्ही सत्ता आणण्यासाठी माझ्यासोबत आला आहात. सुजाण राज्य करण्यासाठी तुमचा उपयोग करायचा आहे. 


उद्धव ठाकरे राज ठाकरेंवर अनुल्लेखाने टीका


शिक्षकांनी शिक्षकांचा काम केलं पाहिजे, दुसऱ्या ड्युटीवर लावता कामा नये, नाही तर शिक्षक शिकवणार कसं, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. काही जण या विषयावर हात-पाय मारून जातात, पण पुढे काही करत नाही. आता मी लढेल जिंकल्यानंतर तुम्हाला न्याय देण्याची जबाबदारी माझी, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे.


शिक्षक मतदारसंघामध्ये शिवसेनेचं दुर्लक्ष


शिक्षकांची बाजू मांडणारा शिक्षकांचा आवाज आपल्याकडे हवा, म्हणून आपल्याला अभ्यंकरांना विधान परिषदेत पाठवायचं आहे. शिक्षक मतदारसंघामध्ये शिवसेनेचं दुर्लक्ष झालं होतं. निवडणुकीत अभ्यंकर विजयी झाले म्हणजे झालं नाही तर तुमचे विषय मार्गी लागले पाहिजे, असं यावेळी उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.


सध्या फोडाफोडीचं राजकारण सुरु


ते पुढे म्हणाले की, 'तुम्ही शाळेत मेहनत करुन भावी पिढी तयार करता, भावी पिढी नासणार असेल आणि नासक्या-कुसक्या लोकांच्या हाती जाणार असेल, तर आपल्या शिक्षणाचा फायदा काय तुम्ही योग्य वेळी शिवसेनेत येण्याचा निर्णय घेतला. सध्या फोडाफोडीचं राजकारण सुरु आहे.'


अबकी बार भाजप तडीपार


'अबकी बार भाजप तडीपार. यांना तडीपार केल्याशिवाय आपल्याला काहीही मिळणार नाही. तडीपारची नोटीस त्यांना दिली आहे, आता त्यावर सही तुम्हाला करायची आहे, त्यांना तडीपार तुम्ही करायचं आणि त्यांना तडीपार केल्याशिवाय तुम्ही राहणार नाही', असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला आहे.