Uddhav Thackeray : अलिबाग (Alibaug) इथल्या ठाकरे कुटुंबाच्या कथित 19 बंगल्यांच्या घोटाळाप्रकरणी नुकतीच तत्कालीन ग्रामपंचायत सदस्य आणि कर्मचारी यांच्याविरोधात नुकताच गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.


मागील काही महिन्यांपासून भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर 19 बंगल्यांचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप केला होता. याप्रकरणी अनेक वेळा किरीट सोमय्या यांनी अलिबागजवळच्या कोर्लई गावाला भेट दिली होती. तसंच स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार देखील दिली होती. मात्र या प्रकरणात कुठलीही हालचाल पाहायला मिळाली नव्हती.


अखेर किरीट सोमय्या आरोप करत असलेल्या कथित बंगला घोटाळा प्रकरणात कोर्लई ग्रामपंचायतच्या ग्रामविकास अधिकारी संगीता भांगरे यांनी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांविरुद्ध फसवणूक, संगणमत यासोबतच 19 बंगल्यांच्या रेकॉर्डमध्ये खाडाखोड करणे याप्रकरणी तक्रार दिली. यानंतर रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. एकूण सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून यामध्ये तत्कालीन ग्रामसेवकाचा देखील समावेश आहे. 


नेमकं काय प्रकरण आहे?


1. अलिबाग येथील अन्वय नाईक यांच्याकडून उद्धव ठाकरे यांनी साडेनऊ एकर जमीन आणि त्यावरील 19 बंगले 2013 साली विकत घेतले. 


2. तीन एप्रिल 2014 रोजी रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांच्या नावे पार्टनरशिपमध्ये जमीन आणि बंगले घेण्यात आले आणि ही प्रॉपर्टी नावे करण्यासाठी ग्रामपंचायतीला पत्रे देखील देण्यात आली


3. एक एप्रिल 2013 ते 31 मार्च 2021 पर्यंत 21 बंगल्यांची घरपट्टी ठाकरे यांनी स्वतःच्या खात्यामधून भरली


4. उद्धव ठाकरेंनी निवडणुकीत जे प्रतिज्ञापत्र दाखल केलं त्यात सदर जमीन दाखवण्यात आली. मात्र बंगले दाखवण्यात आले नाहीत यावरच किरीट सोमय्या यांनी आक्षेप घेतला.
 
5. किरीट सोमय्या यांचा असा आरोप आहे की त्यांच्या तक्रारीनंतर स्थानिक ग्रामपंचायतीवर उद्धव ठाकरे यांनी दडपण आणून 19 बंगल्यांच्या रेकॉर्डवर खाडाखोड केली आणि बंगले गायब केले.


किरीट सोमय्यांचे आरोप


किरीट सोमय्या यांचा असाही आरोप आहे की 2008 मध्ये या जागेवर ग्रामपंचायतीने बंगले बांधल्याचं सर्टिफिकेट दिलं असताना शिवाय त्याचा टॅक्स भरला जात असताना अचानक 2022 मध्ये रेकॉर्ड मध्ये बंगलेच नाहीत असं कसं काय दाखवता येतं. आजची या बंगल्यांची रेडी रेकनर दराने तब्बल साडेआठ कोटी रुपये इतकी रक्कम आहे. हे सर्व उद्धव ठाकरेंनी रेकॉर्डमध्ये दाखवलेले नाही याचाच अर्थ ती संपत्ती बेनामी संपत्ती आहे.


सत्ताबदल झाल्यानंतर गुन्हा दाखल


राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना किरीट सोमय्या यांनी वारंवार आरोप करुन देखील तक्रार घेण्याशिवाय कुठलीही हालचाल पोलीस प्रशासनाकडून झाली नव्हती. मात्र राज्यात सत्तांतर झालं आणि आता याप्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कदाचित यामुळे उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ झाल्यास आश्चर्य वाटायला नको.


VIDEO : Uddhav Thackeray Bungalow Case : 19 बंगला कथित घोटाळा प्रकरणी उद्धव ठाकरे पुन्हा अडचणीत?