Pune Bypoll Uddhav Thackeray : भाजपने आतापर्यंत वापरा आणि फेकून द्या असेच धोरण अवलंबले आहे. मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या निधनानंतर भाजपने (BJP) टिळक कुटु्ंबीयांना वापरून फेकून दिले असल्याचा घणाघाती हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला. कसबा (Kasaba) आणि चिंचवड (Chinchwad) पोटनिवडणुकीसाठी त्यांनी मतदारांना ऑनलाईन पद्धतीने संबोधित केले. यावेळी भाजपला कोणतीही सहानुभूती दाखवण्याची गरज नसल्याचे त्यांनी म्हटले. भाजपची पाशवी पकड दूर फेकण्याची सुरुवात या पोटनिवडणुकीपासून करण्याचे आवाहन यावेळी उद्धव ठाकरे यांनी केले. यावेळी राज्यात मध्यावधी निवडणूका जाहीर होण्याची शक्यता असल्याचेही ठाकरे यांनी म्हटले.
भाजपला सहानुभूती दाखवण्याची गरज नाही
पुण्यातील चिंचवड आणि कसबा विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. महाविकास आघाडी म्हणून ही निवडणूक लढवत आहे. तर, दुसरीकडे शिवसेना-शिंदे गट
आणि भाजप युतीचे उमेदवार आहेत. प्रचारात दोन्ही बाजूचे अनेक दिग्गज नेते सहभागी झाले आहेत. त्यातच आज, उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन पद्धतीने मतदारांशी संवाद साधला. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, शिवसेनेची लढाई सुरू आहे. यामध्ये आम्हाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची साथ मिळत आहे. महाविकास आघाडी म्हणून ही निवडणूक लढवत आहोत. मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांचे निधन ही दुर्देवी घटना असल्याचे ठाकरे यांनी म्हटले. भाजपने टिळक कुटुंबातील सदस्यांना तिकीट का नाकारली, असा प्रश्न त्यांनी केला. भाजपने फक्त त्यांचा वापर केला. खासदार गिरीश बापट यांची प्रकृती सध्या चांगली नाही. तरीदेखील त्यांना गंभीर अवस्थेत प्रचार करण्यास भाग पाडले जात आहे. हा प्रकार दु्र्देवी नाही का, असा प्रश्न त्यांनी ठाकरे यांनी केला. भाजप नेत्यांकडून असे दुर्देवी प्रकार सुरू असताना दुसरीकडे त्यांना सहानुभूती दाखवण्याची काही गरज नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
शिवसेना संपवण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्यांना साथ देणार का?
उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, कोल्हापूर पोटनिवडणुकीत आणि आताही शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीला मतदान करणार का असा प्रश्न केला जात आहे. आम्ही या आधी 25 वर्ष भाजपला मतदान करतच होतो असे सांगत भाजपकडून शिवसेना संपवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. तुमचा वापर करून पाशवी पकड मजबूत करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. आमच्यासोबत आलात तर तुम्ही चांगले आणि आमच्या विरोधात गेलात तर तुरुंगात जाल हे भाजपचे धोरण आहे. आमच्याविरोधात गेलात तर चौकशी आणि भाजपसोबत आले तर स्वच्छ कारभार असा ठसवण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाजपच्या काही नेत्यांनी स्वपक्षीय नेत्यांनादेखील सोडले नाही. त्यांच्याविरोधात चौकशीचा ससेमिरा लावला असल्याचे ठाकरे यांनी म्हटले. ही चुकीची वृत्ती गाडायची असून पिंपरी आणि चिंचवडपासून सुरू करायला हवी आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीला विजयी करावेच लागेल असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.
इतर महत्त्वाच्या बातम्या: