मुंबई : राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने सध्या महाराष्ट्राचे लक्ष राज्याच्या विधिमंडळाकडे लागले आहे. त्यातच, औरंगजेबाच्या विषयावरुन नागपुरातील हिंसाचार थांबतो ना थांबतो तोच पुन्हा एकदा दिशा सालियन प्रकरणावरुन गदारोळ सुरू झाला आहे. याप्रकरणी, मंत्री नितेश राणे यांच्याकडून थेट शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंवर (Aditya Thackeray) गंभीर आरोप केले जात आहेत. त्यातच, दिशाचे वडिल सतिश सालियन यांच्या वकिलानेही आदित्य यांच्यासह काही सेलिब्रिटींवरही गंभीर आरोप केले आहेत. आता, त्याच अनुषंगाने आदित्य ठाकरेंना विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिलं. एबीपी माझाच्या व्हिजन महाराष्ट्रमध्ये शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी सहभाग घेतला होता. येथील मुलाखतीमध्ये आदित्य ठाकरे यांना पहिलाच प्रश्न सध्या सुरू असलेल्या दिशा सालियनप्रकरणावर विचारण्यात आला. त्यावर, आदित्य ठाकरेंनी उत्तर देताना मंत्री नितेश राणेंना (Nitesh Rane) कचऱ्याची उपमा दिली. तसेच, नितेश राणेंचं नाव घेताच... शीsss अशी प्रतिक्रिया आदित्य यांनी दिली.
जेव्हा जेव्हा भाजप अडचणीत येतं, तेंव्हा भाजपा काही ना काही मुद्दे काढते. मग, औरंगजेब असेल, अबू आझमी असेल आणि आता मी आहे. गेल्या 5 वर्षांपासून बदनामीचा प्रयत्न सुरू आहे, असे उत्तर आदित्य ठाकरे यांनी दिले. तसेच, सत्ताधाऱ्यांकडे व्हिजन नसल्यानेच कुठे तरी विषय भरकटवण्याचं काम केलं जातंय, असेही ठाकरेंनी म्हटले. मुलीच्या वडिलांनीच कोर्टाकडे आता धाव घेतलीय, असे आदित्य यांना विचारले असता प्रश्न कोर्टात आहे, आम्ही कोर्टात बोलू, असे उत्तर आदित्य यांनी दिले. तसेच, कचऱ्याकडे मी लक्ष देत नाही, 5 वर्षांपासून सातत्याने बदनामीचा प्रश्न सुरू आहे, असे आदित्य यांनी म्हटले. तसेच, नितेश राणेंचं नाव येताच आदित्य ठाकरेंनी शीsss.. असं म्हणत राणेंच्या प्रश्नावर बोलणं टाळलं.
मी कचऱ्याकडे लक्ष देत नाही
दरम्यान, हे प्रकरण जेव्हा झालं तेव्हा उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केले होते, असा दावा नितेश राणेंनी केला आहे. यासंदर्भात आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, कचऱ्याकडे मी लक्ष देत नाही, महापालिकेला फोन करुन सांगतो की कुठेतरी कचरा पडलाय, पण मी लक्ष देत नाही, असे उत्तर आदित्य यांनी दिले. निवडणुका आल्या किंवा भाजप अडचणीत आल्या की हे सुरू होतं, असेही आदित्य ठाकरेंनी म्हटलं.
नेत्यांची पोरं परदेशात शिकतात, कार्यकर्त्यांवर गुन्हे पडतात
औरंगजेबाची कबरं खोदली पाहिजे असं म्हणतात, मग यामध्ये कार्यकर्ते पुढे राहणार. मात्र, भाजपमधील नेते, मंत्र्यांची मुले अधिकतर परदेशात शिकली आहेत. काही परदेशात व्यवसायात आहेत. दंगलीत हिंदू आणि मुस्लीम पोरांवर केस पडल्या आहेत. यांनाच नंतर नोकरी व्यवसाय करताना पोलिसांकडून कागदपत्रे घेण्यासाठी बॉसकडे जावं लागतं. मरतोय कोण, गरीब माणूस मरत आहे. आगी लावणाऱ्यांचे काही जात नसल्याचेही आदित्य ठाकरेंनी यावेळी स्पष्टपणे म्हटले.
हेही वाचा
CBSE चा महाराष्ट्र पॅटर्न 70 अन् 30 टक्के; शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचा इतिहास अनिवार्य असणार