मुंबई : महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये सोमवारी रात्री हिंसाचार उफळला होता. दोन गटांतील धार्मिक तेढ निर्माण झाल्यामुळे मोठी जाळपोळ आणि दगडफेकीची घटना नागपुरात घडली. या घटनेसंदर्भात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी आज सभाहात निवदेन दिले. यावेळी, सत्ताधाऱ्यांना या घटनेवरुन धारेवर धरणाऱ्या शिवसेना उबाठा पक्षाच्या आमदारांना एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) आक्रमक शैलीत सुनावलं. तर, महाविकास आघाडीच्या काळातील घटनांचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंवरही (Uddhav Thackeray) हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळालं. खुर्चीसाठी यांनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले. तुम्ही काँग्रेस सोबत जाऊन खुर्ची मिळवलीस, पण विचारधारा सोडली. ह्यांचे प्रमुख हे गेले होते लोटांगण घालून आले. मला वाचवा मला वाचवा म्हणाले तिथ जाऊन सांगून आले की आम्ही महायुती सरकारमध्ये सामील होऊ. मात्र, त्यांचा डाव मी पलटवून टाकला. नोटीस आल्यावर गेले होते लोटांगण घालायला, अशा शब्दात एकनाथ शिंदेंनी सभागृहात गौप्यस्फोटांची मालिकाच लावली.
महाविकास आघाडी सरकार असताना देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांना जेलमध्ये टाकण्याचा त्यांचा डाव होता. औरंग्याचे विचार यांनी घेतले, मात्र मी बाळासाहेबांना सोडलं नाही. त्यामुळे, माझ्यासोबत 60 लोक आले, हिंदुत्वाचं सरकार मी आणलं. तुम्हाला फक्त 20 लोक निवडून आणता आले, असे म्हणत जनतेचा कौलही आमच्याच बाजुने असल्याचे एकनाथ शिंदेंनी म्हटले. एक अंदर की बात सांगतो ह्यांचे प्रमुख मोदींना भेटायला गेले आणि माफी मागू लागले मला वाचवा. अनिल परब तुम्ही देखील दिल्लीला गेला होतात आणि तिथ जाऊन माफी मागितली आणि राज्यात माघारी येऊन पलटी मारली, असा गौप्यस्फोटच एकनाथ शिंदेंनी भरसभागृहात केला.
अनिल परब तुम्ही कोणाला भेटला मला माहितीय
ये शेर का बच्चा है, 80 जागा लढवल्या आणि 60 जागा जिंकल्या. आम्ही लढून जिंकू किंवा लढून शहीद होऊ. अनिल परब तुमच्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. कोण नोटिसला घाबरून कुठे गेले हे मला माहिती आहे. मी कमरेखाली वार करत नाही, तुम्हाला नोटिस आल्यानंतर कुठे गेला मला माहिती आहे असाही गौप्यस्फोट शिंदेंनी केला. मला जोपर्यंत कोणी डिवचत नाही तोपर्यंत मी कुणाची कळ काढत नाही. सचिन अहिर तुम्हाला बरंच काही माहिती आहे. मी खुर्चीसाठी काहीच केलं नाही मी स्वतः अमित शाह आणि नरेंद्र मोदींना फोन करून सांगितलं तुम्ही सांगाल तो निर्णय मला मान्य असेल.
नागपूरची घटना दुर्दैवी आहे. अमेरिकेने ओसामा बिन लादेनचं थडगं होऊ नये म्हणून त्याला समुद्रात टाकलं. त्यामुळे औरंग्याबाबत तुम्हाला काय प्रेम आहे. काँग्रेस काळात हे थडगं झालं आहे, असे म्हणत संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर कशाला हवीय, असा सवालच एकनाथ शिंदेंनी उपस्थित केला.
नागपूरच्या घटनेवर सभागृहात निवदेन
नागपुरात सकाळी साडे अकरा वाजता विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. त्यांच्यावर दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला. संध्याकाळी अफवा पसरली की जी चादर जाळली त्यावर धार्मिक मजकूर होता. त्यानंतर संध्याकाळी नमाज पूर्ण झाल्यानंतर लोक रस्त्यावर उतरून घोषणाबाजी करू लागले. त्यावेळी दुसऱ्या भागात दगडफेक सुरू झाली. या दगडफेकीत 33 पोलीस जखमी झाले असून 3 उपायुक्त दर्जाचे अधिकारी आहेत. एका अधिकाऱ्यावर कुऱ्हाडी वार झाला आहे. सकाळी घटना घडली, पोलिसांनी ती बाब मिटवली होती. मात्र, संध्याकाळी काही लोक आले आणि त्यांनी गोंधळ केला. तलवार, लाट्या काट्या वापरल्या. पोलिसांच्या गाड्यांवर देखील हल्ला केला. चिटणीस पार्क हंसापुरी महाल परिसरातील हा प्रकार आहे. दंगल सदृश परिस्थिती याठिकाणी निर्माण झाली होती, अशी माहिती एकनाथ शिंदेंनी सभागृहात दिली. तसेच, औरंगजेब हा लागतो कोण यांचा? लुटारू आहे हा, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी सभागृहात जोरदार भाषण केलं.