सातारा : साताऱ्यात उदनयराजे (Udayanraje Bhosale) आणि शिवेंद्रराजे (Shivendra Raje Bhosale) यांच्या राजकारणाचा इतिहास सर्वश्रुत आहे. राजघराण्यातील एकमेकांचे बंधू असलेले हे दोन नेते कधी एकत्र असतात तर कधी एकमेकांचे कट्टर वैरी म्हणून एकमेकांसमोर उभे ठाकतात. त्यामुळे दोन्ही राजेंनी एकत्र राहावे अशी इच्छा असलेल्या कार्यकर्त्यांचा मात्र हिरमोड होतो. पण आता उदयनराजेंनी प्रत्यक्ष छत्रपतींची शपथ घेतली आणि एकमेकांची साथ सोडणार नाही, पुढच्या निवडणुका एकत्रित लढवू असा शब्द दिला. त्याला निमित्तही तसंच होतं, एका कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेली इच्छा.
यापुढच्या सर्व निवडणुकांमध्ये शिवेंद्रराजे आणि आपण एकत्रित राहू असं वक्तव्य उदयनराजेंनी केलं. त्यावर एक कार्यकर्ता उठला आणि तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगा असं सांगितलं. त्यावर उदयनराजे यांनी काही सेकंदाचा पॉज घेतला आणि थेट शिवरायांची शपथ घेऊन आपण एकत्र राहणार असल्याचं जाहीर केलं.
नेमकं काय घडलं?
महायुतीच्या मेळाव्यातील तिसऱ्या मेळाव्यात उदयनराजेंच्या राजकीय खेळीला छत्रपतींच्या शपथेमध्ये कार्यकर्त्यांनी बांधून घेतल्यामुळे संपुर्ण साताऱ्यात मोठ्या चर्चेला उधाण आलं आहे. साताऱ्यात सोमवारी महायुतीचे तीन मेळावे झाले. यातील तीसरा मेळावा हा आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली शेंद्रे येथे झाला.
या मेळ्याव्यात बोलताना उदयनराजेंनी नेहमीच्या स्टाईलमध्ये आम्ही दोघेही आता एकत्र आल्याचे सांगितलं. आमदारकी, खासदारकीच्या निवडणूकीत एकत्र असू, स्थानिक स्वराज्य संस्थांच्याही निवडणुकीत आम्ही एकत्र राहणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं.
मात्र त्यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांपैकी एकाने महाराज तुम्ही छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन सांगा असं म्हटलं. त्यावर उदयनराजेंनी काही सेकंद पॉज घेतला आणि छत्रपती शिवरायांची शपत घेत आम्ही सर्व निवडणुकीला एकत्र असू असे सांगितले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून त्यांच्या या शपथेचं स्वागत केलं.
या आधी दोन्ही राजे एकमेकांना भिडले
या आधी हे दोन्ही राजे राष्ट्रवादीत असतानाही एकत्र होते. पण निवडणुकीच्या काळात मात्र एकमेकांच्या विरोधात भूमिका घेतल्याचं अनेकदा दिसून आलं. सातारा नगरपरिषदेच्या निवडणुकीत आमदार शिवेंद्रराजेंच्या पत्नी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार असताना उदयनराजेंनी त्यांच्याविरोधात उमेदवार देत निवडून आणलं होतं.
तसेच साताऱ्यातील अनेक प्रश्नांवरून हे दोन्ही राजे एकमेकांना भिडल्याचा इतिहास आहे. आणेवाडी टोलनाक्यावरून या दोन्ही राजांमध्ये आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अनेकदा वाद झाल्याचं साताऱ्याने पाहिलंय. नंतरच्या काळात हे दोन्ही राजे राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेले.
आता लोकसभा निवडणूक असल्यामुळे, भाजपसाठी प्रत्येक खासदार महत्त्वाचा असल्याने वरून आदेश आल्यामुळे हे दोन राजे सध्या तरी एकत्र दिसतात. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतल्यानंतर आता उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यापुढच्या सर्वच निवडणुकांमध्ये एकत्र राहतात की ही शपथ हवेत विरून जाते हे येणारा काळच ठरवेल.
ही बातमी वाचा: