रत्नागिरी : कोकणात (Konkan News) महायुतीत विधानसभेच्या जागांवरून (Vidhan Sabha Election) शिमगा होणार का? असा प्रश्न आता उभा राहिला आहे. याचं कारण म्हणजे भाजपला येत्या विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यातील पारंपारिक दोन मतदारसंघ सोडले जावेत अशी मागणी भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी केली आहे. दरम्यान भाजपला एकही जागा न मिळाल्यास आम्ही मैत्रीपूर्ण लढतीसाठी तयार आहोत असा दावा देखील सावंत यांनी केला आहे. तसेच वेळ पडलीच तर आम्ही स्वतंत्रपणे देखील विधानसभा निवडणूक लढू असे देखील सावंत यांनी म्हटलं आहे. पारंपरिक विधानसभा मतदारसंघाचा उल्लेख करताना सावंत यांनी रत्नागिरी आणि गुहागर या विधानसभा मतदारसंघाचे नाव घेतलं नसलं तरी रत्नागिरी आणि गुहागर या विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार होते. पण सध्यास्थितीचा विचार केल्यास रत्नागिरी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचा एकही आमदार नाही. त्यामुळे दक्षिण जिल्हाध्यक्षांनी केलेल्या या मागणीला आता कार्यकर्त्यांनी देखील उचलून धरल्याचे चित्र आहे. दरम्यान याबाबत आता भाजपचे वरिष्ठ नेते काय निर्णय घेणार? याबाबतची चर्चा रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
रत्नागिरीचे विद्यमान आमदार उदय सामंत
रत्नागिरी - संगमेश्वर या विधानसभा मतदारसंघांमध्ये उदय सामंत विद्यमान आमदार आहेत. शिवाय रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ही जबाबदारी देखील त्यांच्याकडे आहे. 2004 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये उदय सामंत यांनी भाजपचे तत्कालीन आमदार बाळ माने यांचा पराभव केला होता. त्यानंतर भाजपला या मतदारसंघांमध्ये आपला लोकप्रतिनिधी निवडून आणता आलेला नाहीये. शिवाय 2024 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत मागच्या काही वर्षांचा विचार केल्यास खासदार देखील या ठिकाणी भाजपचा नव्हता. पण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी - सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघांमध्ये नारायण राणे यांच्या रूपाने भाजपला खंबीर नेतृत्व देखील मिळालं आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत अधिक जागा पदरी पाडून घ्यायच्या अशी भाजपची रणनीती आहे. गुहागर विधानसभा मतदारसंघाचा विचार केल्यास त्या ठिकाणी देखील जवळपास सारखीच परिस्थिती आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव त्या ठिकाणी विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करतात.
''...तर आम्ही रवींद्र चव्हाण यांना बोलणार''
रत्नागिरी जिल्ह्यातील पारंपरिक दोन मतदार संघ विधानसभेमध्ये लढवण्याबाबत आम्ही आमच्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचवल्या आहेत. वेळ पडलीच तर अगदी आम्ही मैत्रीपूर्ण लढत देखील करू. शिवाय स्वबळावर लढण्याची तयार देखील भाजपची आहे. याबाबत आम्ही रवींद्र चव्हाण यांच्याशी चर्चा आणि मागणी करणार असल्याचे देखील सावंत यांनी सांगितला आहे. त्यामुळे आता महायुतीत कोकणातल्या जागांवरून वादाची ठिणगी पडते का? शिवसेनेचे नेते, रत्नागिरी - संगमेश्वर या विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत याबाबत काय भूमिका घेणार? याबाबतची उत्सुकता आणि चर्चा रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये भाजपचे आमदार किती?
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांनी विजय मिळवला. दरम्यान या दोन्ही जिल्ह्यांचा विचार केल्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली या विधानसभा मतदार नितेश राणे यांच्या रूपाने भाजपचा केवळ एकच आमदार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन विधानसभा मतदारसंघ असून भाजपचा एकच विद्यमान आमदार आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाच विधानसभा मतदारसंघात भाजपचा एकही आमदार नाही. दरम्यान दोन्ही जिल्ह्यांचा विचार केल्यास एकूण आठ विधानसभा मतदारसंघांपैकी केवळ एकच आमदार सध्या भाजपचा आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपला रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किती जागा मिळणार? मिळालेल्या जागांपैकी भाजपचे किती लोकप्रतिनिधी निवडून येणार? भाजपला कोकणातल्या जनतेचा कसा पाठिंबा मिळणार? याबाबतची चर्चा आणि उत्सुकता सध्या सर्वत्र दिसून येत आहेत.
हे ही वाचा :