Continues below advertisement

नागपूर : तुकाराम मुंढे (Tukaram mundhe) यांच्याविरुद्ध लक्षवेधी आणण्यावरुन राजकीय वातावरण तापलं असून भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी आज विधानसभा सभागृहात तुकाराम मुंढेंच्या समर्थकांकडून आपणास बघून घेऊ, अशी धमकी आल्याचं म्हटलं. तसेच, सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी चुकीच्या पद्धतीने स्मार्ट सिटी प्रकल्पाचा अतिरिक्त पदभार आपल्याकडे ठेऊन घेतला होता, यासंदर्भात आपण लक्षवेधी दिली असून त्यामध्ये सविस्तरपणे लिहिण्यात आल्याचं सांगितलं. तसेच, त्यांच्यावरील लक्षवेधीमुळे आपणास दोन जणांनी फोन करुन धमकी दिली. नागपूर (Nagpur) अधिवेशनासाठी आलो असता, मला धमकीचे फोन आल्याचंही त्यांनी म्हटलं. दरम्यान, आज सभागृहात तुकाराम मुंढेंविरुद्ध आमदार कृष्णा खोपडे (BJP) आणि आमदार प्रवीण दटके यांनीही तक्रार केली. तर, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी तुकाराम मुंढेंची बाजू घेतली.

आमदार कृष्णा खोपडे यांनी विधानसभेत तुकाराम मुंढेंच्या लक्षवेधीचा मुद्दा आज उपस्थित केला. तसेच, आपणास त्यांच्या समर्थकांकडून धमकीचे फोन आल्याचंही त्यांनी सांगितलं. तसेच, आमदार प्रवीण दटके यांनीही सनदी अधिकारी तुकाराम मुंढेंच्याविरोधात सभागृहात भूमिका घेतली. 20 ऑक्टोबर 2025, धनंजय भागवत कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन यांनी हे पत्र लिहिलं आहे, त्यामध्ये नागपूर स्मार्ट सिटी संदर्भातील नियुक्तीवरुन कारवाई करण्याचे पत्र असल्याचं दटके यांनी निदर्शनास आणून दिले. तसेच, तुकाराम मुंडेंनी डिलिव्हरी नंतर 5 दिवसांच्या प्रसुत महिलेची सुट्टी रद्द केली, दुसऱ्या एका महिलेनं तक्रार केली आहे, तुकाराम मुंडेंनी म्हटलं त्या नस्तीवर सही नाही केली म्हणून त्यांना विचित्र शब्दाचा प्रयोग झाला, त्याची महिला आयोगाकडे तक्रार झाली.

Continues below advertisement

विजय वडेट्टीवारांनी घेतली तुकाराम मुंढेंची बाजू

तुकाराम मुंढे हे प्रामाणिक आहेत की नाही, ते इमानदार आहेत की नाही. नागपूर महापालिकेत असताना तुकाराम मुंढेंना आयुक्तांनी क्लीन चीट दिलीय हे रेकॉर्डवर आहे. महिला आयोगाकडेही तक्रार झाली होती, पण ज्या महिलेनं तक्रार केली त्या महिलेवरच महिला आयोगाने दंड लावला, हे बघून घ्या. केंद्रीय महिला आयोगानेही क्लीन चीट दिली आहे. त्यामुळे, तुकाराम मुंढे यांच्यावर जे आरोप झाले आहेत, ते कोणाच्या स्वार्थापायी झाले आहेत. मुख्यमंत्र्‍यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, सत्य परिस्थिती तपासून, काही चूक असेल तर कारवाई करावी. पण, निर्दोष असतील तर कुठल्याही दबावाखाली ही कारवाई होऊ नये, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले. दरम्यान, कुठल्याही लोकप्रतिनिधीला अशी धमकी येत असेल तर संबंधितांवर कारवाई झालीच पाहिजे, तशी आमदार कृष्णा खोपडे यांना धमकी देणाऱ्यांवरही कारवाई करावी, असेही वडेट्टीवार यांनी म्हटले.  

हेही वाचा

'त्या' दिवशी बीड जिल्हा बंद, राज्यात एकही चाक फिरणार नाही; मनोज जरांगे पाटलांचा मस्साजोगमधून इशारा