पुणे: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि कामगार नेते बाबा आढाव (Baba adhav) यांचे काल (सोमवारी, ता ८) निधन झाले आहे. वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.  गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते. पुण्यातील पुना हॉस्पीटमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर काल उपाचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान, बाबा आढाव यांच्या निधनाने कष्टकऱ्यांचा विठ्ठल हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. कागद, काच पत्रा वेचणाऱ्यांसह रिक्षा चालक, सफाई कामगार असे जे कामगार असंघटीत आहेत, त्यांच्यासाठी बाबा आढावांनी आपलं आयुष्य वेचलं होतं. या असंघटीत कामगारांना पेन्शन मिळावी यासाठी बाबा आढाव यांनी मोठा लढा उभारला होता. (Baba Adhav passes away) बाबा आढाव यांच्या निधनानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भावनुक पोस्ट सोशल मिडीयावरती शेअर केली आहे. 

Continues below advertisement

Raj Thackeray on Baba adhav: राज ठाकरेंची भावनिक पोस्ट

 ज्येष्ठ समाजसेवक आणि कष्टकऱ्यांसाठी संपूर्ण आयुष्य वेचलेल्या बाबा आढावांचं निधन झालं. महाराष्ट्राने या देशांत समाज प्रबोधनाचा सज्जड पाया घातला आणि सामाजिक कार्यकार्यांच मोहोळ तयार केलं. त्यातलं एक अत्यंत महत्वाचं नाव बाबा आढाव. बाबा आढाव हे पेशाने डॉक्टर. पण डॉक्टरकीचा व्यवसाय सोडून त्यांनी स्वतःला सामाजिक कार्यात ढकलून घेतलं. महाराष्ट्राचं हे एक वैशिष्ट्य की, सामाजिक क्षेत्रांत उत्तुंग कार्य केलेली माणसं, उच्चशिक्षित आणि जर त्यांनी त्यांच्या क्षेत्रांत करिअर करायचं ठरवलं असतं तर तितकीच मोठी कारकीर्द घडवू शकले असते अशी माणसं सामाजिक क्षेत्रांत आली आणि त्यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीला आकार दिला. हल्ली अशी माणसं तयार होत आहेत का ? माहित नाही. हल्ली सामाजिक कार्यकर्ते म्हणून मिरवणारे, स्वतःचे तशा नावाचे फ्लेक्स लावणाऱ्यांचा सुळसुळाट आहे, असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

असो, पण रिक्षा पंचायत असो, हमाल पंचायत असो की १९७२ साली एक गाव एक पाणवठासाठी उभी केलेली चळवळ असो, की १९६९ ला राज्यात मंजूर झालेला महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार कायदा असो, हे बाबांचं मोठं योगदान. बाबा आढावांनी संपूर्ण आयुष्य कष्टकरी, असंघटित कामगार आणि श्रमिकांच्या हक्कांसाठी संघर्ष उभा केला. आर्थिक उदारीकरणाच्या नंतरच्या काळात कामगारांचं आणि श्रमिकांच शोषण करणारी एक नवी व्यवस्था आता जन्माला आली आहे. आणि जिला सरकारचं समर्थन आहे. सध्या तर सरकारं ही उद्योगशरण आहेत आणि कामाचे तास, वेळा याबाबत सरकार उद्योगजगताला शिस्त देखील लावू शकत नाही, हे नुकत्याच विमान कंपनीच्या उदाहरणातून दिसलं. यामुळे संघटित असो की असंघटित कामगार किंवा नव्याने उदयाला येत असलेला ज्याला 'गिग वर्कर' म्हणता येईल असे सगळेच असुरक्षतितेच्या गर्तेत सापडले आहेत. बाबा आढावांची एकूणच समाजकारणाकडे बघण्याची भूमिका व्यापक होती आणि त्यामुळेच ईव्हीएमच्या विरोधात वयाच्या ९५ व्या वर्षी त्यांनी आत्मक्लेश आंदोलन केलं होतं. हे खरं समाजकारण जे एनजीओ संस्कृती उदयाला येण्याच्या आधीच्या काळातलं, जिथे प्रत्येक विषयात मतं होती आणि ठोस भूमिका होती. बाबा आढावांसारखी माणसं परत या राज्यात कधी होतील ? माहित नाही, पण ती घडवण्याची शक्ती या भूमीत नक्की आहे, त्यामुळे अशी माणसं पुन्हा घडावीत हीच इच्छा. बाबा आढावांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली. राज ठाकरे ।

Continues below advertisement