मुंबई : राज्य मागासवर्ग आयोगाच्या (Backward Classes Commission) अध्यक्षपदी निवृत्त न्यायाधीश सुनील शुक्रे (Sunil Shukre) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, त्यांच्या याच नियुक्तीला आता गुणरत्न सदावर्तेंनी (Gunaratna Sadavarte) विरोध केला आहे. "मनोज जरांगेंना (Manoj Jarange) सर सर करणारे आता मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष झाले आहेत. त्यामुळे आपल्याला मराठा आयोग निर्माण करायचा नसून, मागासवर्ग आयोग द्यायचा आहे, असा खोचक टोला सदावर्ते यांनी लगावला आहे. 


निवृत्त न्यायाधीश सुनील शुक्रे यांच्या राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी झालेल्या नियुक्तीला गुणरत्न सदावर्ते यांचा विरोध पाहायला मिळत आहे. राज्य मागासवर्ग आयोग आहे की, मराठा आयोग? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ही नियुक्ती पारदर्शक नाही. संविधानिक दृष्टीकोनातून ही नियुक्ती शुक्रे साहेबांनी स्वीकारू नयेत. या विरोधात आम्ही मुख्यमंत्री, राज्यपाल, राष्ट्रपती यांना पत्र लिहले आहे. वेळ पडल्यास या नियुक्तीच्या विरोधात न्यायालयात देखील जाऊ, असा इशारा सदावर्ते यांनी दिला आहे. 


नियुक्त्या नियमांना धरून नाहीत..


तर, मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी व सदस्यपदी करण्यात आलेल्या नियुक्त्या या नियमांना धरून नाही. देशातील इतर आयोगाच्या नेमणुका ज्या पद्धतीने नियमानुसार होतात, ती पद्धत मुळात इथे अमलात आणलेली नाही, असाही आरोप सदावर्ते यांनी केला आहे. त्यामुळे राज्य मागासवर्ग आयोगाच्या नियुक्त गैर असल्याचा दावाही सदावर्ते म्हणाले आहे. 


अशा झाल्या नवीन नियुक्त्या...


राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी निवृत्त न्यायाधीश सुनील शुक्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगुडे यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्य सरकारकडून शुक्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शुक्रे यांच्याशिवाय तीन सदस्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे. सदस्य पदी ओम प्रकाश जाधव, मारुती शिंगारे, मच्छिंद्रनाथ तांबे यांची नेमणूक करण्यात आली आहे. 


किल्लारीकरांचे गंभीर आरोप 


मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांनी आणि अध्यक्षांनी राजीनामे दिल्यानंतर यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप देखील सुरु झाले आहेत. विशेष म्हणजे राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्य पदाचा राजीनामा देणाऱ्या बी.एल. किल्लारीकर यांनी काही गंभीर आरोप केले आहे. सरकार मागासवर्ग आयोगाला गृहीत धरत होतं, तसेच त्यांचा आयोगात हस्तक्षेप होत होता असे किल्लारीकरांनी आरोप केले आहे. आमच्या अधिकारात सरकारचा हस्तक्षेप होत आहे. शासन त्यांचे निर्णय आणि सूचना आमच्यावर लादत होते. त्यामुळे आम्ही आमचा राजीनामा दिला आहे, असेही किल्लारीकर म्हणाले.



इतर महत्वाच्या बातम्या: 


राज्य मागासवर्ग आयोगाची पुनर्रचना, अध्यक्षपदी सुनील शुक्रेंची नियुक्ती, तीन सदस्यांचीही नेमणूक