Raj Thackeray Interview: ''गांधी चित्रपट पाहून मी भारावून गेलो. कॉलजेला असताना पहिल्यांदा माझ्या मनात असा विचार आला की, इतका भव्य चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांवर आला पाहिजे. यानंतर मी पुन्हा वाचन करण्यास सुरुवात केली. मी बाबासाहेब पुरंदरे, रणजित देसाई वाचले. मी माझ्या आजोबांचं एक ब्रिटिश लेखकाचं पुस्तकही वाचलं. हे सर्व वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की, छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट होऊ शकत नाही'', असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले आहे. मुंबईच्या विलेपार्लेमध्ये 'हर हर महादेव' चित्रपटानिमित्त आयोजित कार्यक्रमात राज ठाकरे यांची अभिनेता सुबोध भावे यांनी मुलाखत घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी आपलं चित्रपट प्रेम आणि इतर अनेक प्रश्नाची उत्तरे दिली आहेत. या चित्रपटाला राज ठाकरे यांनी आपला आवाज दिला आहे. त्यांनी हा चित्रपट हिंदी आणि मराठीत डबिंग करण्यासाठी तब्बल 17 दिवस दिले असल्याचं सुबोध भावे म्हणाले आहेत.
यावेळी शिवाजी महाराजांवर बोलताना ते म्हणाले आहेत की, मला असं वाटत की, अफजल खान, पन्हाळा गडावरून महाराज निघणं आणि विशाल गडावर जाणं, आग्रावरून सुटका. या चार-पाच विषयांच्या पलीकडे प्रचंड मोठे शिवाजी महाराज आहे. मला असं वाटतं आपण फक्त या चार पाच प्रसंगांना घेऊन अडकलो, तर त्या माणसावर आपण अन्याय करतोय. ते म्हणाले, यावरून माझ्या मनात आलं की, आपण टीव्ही सीरिअल करू. यासाठी मी दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्याशी बोललो. त्यांच्याशी या संबंधित माझी दोन ते तीन वेळा चर्चाही झाली. तेव्हा एकदा हीच चर्चा सुरू असताना तिथे नितीन चंद्रकांत देसाई होते. ते म्हणाले, माजी तयारी आहे, हे करायची. मी त्यांना म्हणालो कर. त्यांची ती सीरिअल आलीही. त्याला खूप वर्ष झाली.
शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर चित्रपट बनवण्याची इच्छा व्यक्त करताना राज ठाकरे म्हणाले की, आता सर्व प्लॅटफॉर्म बदलेले आहेत. फिल्ममेकिंगही बदललं आहे. सर्व गोष्टी बदलेल्या आहेत. आता माझं यावर काम सुरू आहे. ते म्हणाले की, याबाबत मी जास्त आता सांगत नाही. मात्र मी याचं काम दिलं आहे. मात्र कोणाकडे दिलं आहे, हे त्यांनी सांगितलं नाही. तसेच याबाबत अधिकची माहिती त्यांनी दिली नाही. ते म्हणाले की, दोन ते तीन भागात मी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर चित्रपट आणण्याचा माझा विचार सुरू आहे. आता मी याविषयी काही बोलत नाही. मात्र झालं तर यावर बोलूच, असं ते म्हणाले आहेत.