Nirmala Sitharaman In Lok Sabha: आज लोकसभेत वाढत्या महागाईवर चर्चा झाली. यावरच बोलताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विरोधी पक्ष नेत्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले आहे की, ''जगभरात महागाई वाढत आहे. कोरोनाचे संकट असूनही देश चांगल्या स्थितीत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) महागाई रोखण्यासाठी वेळोवेळी पावले उचलली आहेत. अमेरिकेचा संदर्भ देत सीतारामन यांनी भारतात मंदीचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे स्पष्ट केले.''


यावेळी बोलताना त्यांनी भारताची तुलना पाकिस्तान आणि बांग्लादेश ऐवजी अमेरिकेशी केली. तसेच वाढती महागाई आणि जगासमोरील आव्हानांचा उल्लेख देखील त्यांनी आपल्या भाषणात केला. सीतारामन म्हणाल्या की, जगात काय चालले आहे, ते पाहावे लागेल. जगात भारताचे कोणते स्थान आहे? जगाला यापूर्वी कधीही अशा महामारीचा सामना करावा लागला नव्हता. महामारीतून बाहेर पडण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या स्तरावर काम करत आहे. म्हणूनच मी याचं श्रेय भारतातील जनतेला देते.


अर्थमंत्र्यांनी सांगितले की, प्रतिकूल परिस्थिती असतानाही गेल्या 2 वर्षांत भारताला जागतिक बँक, IMF आणि इतर जागतिक संस्थांनी चांगली रँकिंग दिली आहे. प्रत्येक वेळी त्यांनी अंदाज व्यक्त केला आहे, त्या काळात जागतिक विकास दर अपेक्षेपेक्षा कमी राहिला आहे. भारताचा विकास दरही अपेक्षेपेक्षा कमी राहिला आहे. पण भारताचा विकास दर प्रत्येक वेळी सर्वाधिक होता. त्या म्हणाल्या की, भारतातील अनुसूचित व्यावसायिक बँकांचे एकूण NPA 2022 मध्ये 5.9% या 6 वर्षांच्या नीचांकी पातळीवर आहेत. चीनच्या 4000 बँका दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहेत. पण भारतात एनपीए कमी होत आहेत. केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे सरकारवरील कर्ज राष्ट्रीय उत्पन्नाच्या 56.9 टक्के आहे.

 


सीतारामन म्हणाल्या की, IMF च्या आकडेवारीनुसार, भारत इतर देशांपेक्षा खूपच चांगल्या स्थितीत आहे. जेथे सरकारवरील कर्ज सरासरी GDP च्या 86.9 टक्के आहे. गेल्या सलग 5 महिन्यांत जीएसटी संकलन 1.4 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. 8 पायाभूत सुविधा क्षेत्राने जूनमध्ये दुहेरी अंकी वाढ केली. जूनमध्ये कोर क्षेत्राने वार्षिक दराने 12.7 टक्के वाढ नोंदवली. भारतीय अर्थव्यवस्था खूप सकारात्मक संकेत देत असल्याचं त्या म्हणाल्या आहेत.